बातम्या

 निधीअभावी कंत्राटदारांचा कामबंद इशारा; १५ एप्रिलपासून विकासकामे ठप्प होणार

Contractors warn of work stoppage due to lack of funds


By Administrator - 9/4/2026 2:12:57 PM
Share This News:



 निधीअभावी कंत्राटदारांचा कामबंद इशारा; १५ एप्रिलपासून विकासकामे ठप्प होणार
 

कोल्हापूर (प्रतिनिधी) – राज्यातील विविध विभागांकडून प्रलंबित देयके मोठ्या प्रमाणात बाकी राहिल्यामुळे कंत्राटदार व विकासकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने दि. १५ एप्रिल २०२६ पासून राज्यभरातील विकासकामे बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदन जिलाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करण्यात आले आहे.
 

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन विकास महामंडळ आदी विभागांकडे कोट्यवधी रुपयांची देयके थकीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुमारे २९,००० कोटी, जलजीवन प्राधिकरणाकडे ३५,००० कोटी, ग्रामविकास विभागाकडे ६,५०० कोटी तर जलसंपदा विभागाकडे सुमारे १,००० कोटी इतकी रक्कम अद्याप बाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 

याशिवाय, जिल्हा नियोजन समिती व इतर विभागांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही निधीअभावी कामे ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
 

गेल्या १७ महिन्यांत शासनाने सुमारे २०,००० कोटी रुपयांची देयके अदा केली असली तरी अद्याप मोठा निधी प्रलंबित आहे. यामुळे राज्यातील सुमारे ३ लाख कंत्राटदार व त्यांच्यावर अवलंबून असलेले लाखो कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. बँकांचे व्याज व इतर आर्थिक भार वाढल्याने अनेक कंत्राटदार मानसिक तणावाखाली आहेत.
 

शासनाकडून वारंवार आश्वासने मिळत असली तरी ठोस निर्णय होत नसल्यामुळे अखेर कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून राज्यातील विविध विकासकामे ठप्प होण्याची शक्यता आहे.


 निधीअभावी कंत्राटदारांचा कामबंद इशारा; १५ एप्रिलपासून विकासकामे ठप्प होणार
Total Views: 26