बातम्या
आशियात कॉर्पोरेट वर्चस्व वाढतेय; शेतकरी, कामगार आणि आदिवासींसाठी धोक्याची घंटा – राजू शेट्टी
By Administrator - 3/4/2026 5:15:41 PM
Share This News:
आशियात कॉर्पोरेट वर्चस्व वाढतेय; शेतकरी, कामगार आणि आदिवासींसाठी धोक्याची घंटा – राजू शेट्टी
आशिया खंडात साम्राज्यवादी शक्ती आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्व हे शेतकरी, कामगार आणि आदिवासी वर्गासाठी गंभीर चिंतेचे कारण बनले आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे झालेल्या देशपातळीवरील शेतकरी संघटनांच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली.
जल, जंगल, जमीन आणि खनिजे यांसारख्या नैसर्गिक संसाधनांवर कॉर्पोरेट कंपन्यांनी ताबा मिळवण्याचा वेग वाढवला असून याचा थेट फटका भारतीय शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी वर्गाला बसत आहे. यामुळे देशाच्या सार्वभौमत्वावरही गंभीर परिणाम होत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर साम्राज्यवादी शक्ती आशियातील संसाधनांवर नियंत्रण मिळवून केवळ आर्थिक शोषण करत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोलही बिघडवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील उपजीविकेवर मोठे संकट निर्माण झाले आहे. तसेच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळमधील निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता असून महागाई वाढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
भारतामध्ये सध्या राबवली जाणारी धोरणे आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या दबावाखाली असल्याचा आरोप करत, ही धोरणे शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेसोबत झालेल्या काही असमान करारांमुळे भारतीय शेती, बी-बियाणे आणि अन्न पुरवठा साखळीवर परकीय नियंत्रण वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
भारतीय शेतकरी सध्या तीन आघाड्यांवर लढत असल्याचे त्यांनी सांगितले—देशांतर्गत शेतकरीविरोधी धोरणे, संसाधनांवरील कॉर्पोरेट ताबा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढणारा साम्राज्यवाद.
📌 बैठकीतील प्रमुख मागण्या :
- नैसर्गिक संसाधनांवरील कॉर्पोरेट ताबा त्वरित थांबवावा
- शेतकऱ्यांच्या जमिनीचे हक्क संरक्षित करावेत
- परकीय देशांसोबत झालेले करार सार्वजनिक करून संसदेत चर्चा करावी
- कृषी क्षेत्र कॉर्पोरेट नियंत्रणातून मुक्त करावे
- शेतमालाला हमीभाव (MSP) आणि न्याय्य मोबदला द्यावा
केंद्र सरकारने विदेशी दबावाला बळी न पडता देशातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करत, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दिल्लीतील संसद मार्गावर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला.
या बैठकीला सरदार व्ही. एम. सिंह, राजाराम सिंह, सुदामा प्रसाद, हानन मौला, राजन क्षीरसागर, अर्जुनसिंग राजपूत, प्रेमसिंग गेहलावत, पी. के. सहाय्य, गुरुदेव सिंह नेहाल आणि सुमन हुड्डा यांसह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आशियात कॉर्पोरेट वर्चस्व वाढतेय; शेतकरी, कामगार आणि आदिवासींसाठी धोक्याची घंटा – राजू शेट्टी
|