बातम्या
*आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांचा प्रशासनाच्या कारभारावर जोरदार प्रहार
By nisha patil - 8/25/2026 1:10:10 PM
Share This News:
*आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांचा प्रशासनाच्या कारभारावर जोरदार प्रहार
*आरोग्य, कचरा आणि पाणी पुरवठा व्यवस्थापनावर खडाजंगी
*आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची मासिक सभा दि. 24ऑगस्ट रोजी नगरपंचायतीच्या कै. काशिनाथ आण्णा चराटी सभागृहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोकआण्णा चराटी होते. सभेत प्रामुख्याने कचरा, आरोग्य आणि पाणी योजनेवर जोरदार चर्चा झाली. सभेत प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात खडाजंगी चर्चा झाली. अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. स्वागत व सभेसमोरील विषयांचे वाचन निहाल नाईकवाडे यांनी केले.
या सभेमध्ये प्रामुख्याने खड्ड्यामध्ये मुरुमाऐवजी डीएससी टाकणे, शहरातील सार्वजनिक विहिरीची डागडुगी करून स्वछता करणे, गणेशचतुर्थीच्या अगोदर गणेश विसर्जनाच्या मार्गांची स्वच्छता करणे, जनवारांच्या बाजाराची मोजणी करून तेथील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय, गांधीनगरमधील घरकुलांना बांधकाम परवाने देणे तसेच रामतीर्थावरील धर्मशाळा व निवासीस्थानाची दुरुस्ती करण्याबाबतचे मुख्यत्वे ठराव करण्यात आले.
नगराध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांनी नळांना पाणी मीटर बसवल्याशिवाय पाण्याचा अपव्यय थांबणार नाही. गटारीला जाणारे पाणी थांबवायचे असेल तर नळांना मीटर बसवले पाहिजे यामुळे पाण्याचा योग्य वापर होईल व नगरपंचायतीचे वीज बिलही वाचेल असे सांगताच नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार आणि अन्वी केसरकर यांनी नळ पाणी मिटरना जोरदार विरोध केला. स्पष्ट करताना अभिषेक शिंपी म्हणाले की, पाणी पुरवठा योजना अजूनही अपूर्ण आहे. नगरपंचायतीचे वीज बिल वाचवायचे असेल तर पाण्याच्या टाक्या भरून ओव्हरफ्लो होऊन जे हजारो लिटर पाणी वाया जाते त्याला आवर घालण्यासाठी टाकी भरल्यानंतर ऑटो बंदची सुविधा करणे गरजेचे आहे.परंतु ठेकेदार यांनी ही बाब इस्टीमेटमध्ये समाविष्ट नसल्याचे सांगितले यावर पुढे चर्चा करून निर्णय घेऊया असे म्हणत नगराध्यक्षानी प्रश्न पुढे ढकलला. तरीसुद्धा नळांना मीटर बसवण्यासाठी बहुतांशी नगरसेवकांनी जोरदार विरोध केला.
दर्गागल्ली, वाणीगल्ली तसेच सीडफार्म पर्यंतचा आजऱ्यातील महागाव रस्ता पाटबंधारे विभागाकडे असल्याने या रस्त्याची दुरुस्ती व देखभाल होत नसल्याने तेथील नागरिकांचा रोष वाढत आहे त्यामुळे हा रस्ता नगरपंचायतीकडे हस्तांतरीत करून घ्यावा अशी ठाम मागणी नगरसेविका रेश्मा नौशाद बुडडेखान यांनी केली. सभेत कचरा उठाव व नियोजनाबद्दल परशुराम बामणे(भाऊजी) व परेश पोतदार यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामध्ये नगराध्यक्षानी बाजू मंडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोग्याचा मूलभूत प्रश्न असल्याने याचे योग्य नियोजन होणे आवश्यक असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. जनावरांच्या बाजार जागेची मोजणी करून तेथील अतिक्रमणे हटवावीत अशी सूचना परेश पोतदार आणि विक्रम पटेकर यांनी केली. शहरात नळ कनेक्शनसाठी पैसे भरूनसुद्धा सहा सहा महिने कनेक्शन मिळत नसल्याचे निसार लाडजी यांनी सांगितले. तर पाणी पुरवठा ठेकेदाराकडून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यावरून बामणे भाऊजी, आसिफ पटेल आणि निसार लाडजी यांची ठेकेदार आर. डी. देसाई व अधिकारी हातकर यांच्याशी जोरदार चर्चा झाली. स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्यावर सोपवलेली कामे आणि प्रत्यक्षात होत असलेल्या कामाची माहिती तसेच कामावर नियमित हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करावी तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे हालचाल रजिस्टर ठेवण्याबाबत परेश पोतदार यांनी मागणी केली.
यावेळी सभेतील विविध विषयावरील चर्चेत उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, नगरसेवक असिफभाई सोनेखान, अश्विनी चव्हाण, अनिकेत चराटी,रहिमतबी खेडेकर,प्रा.पूनम लिचम, डॉ. इंद्रजित देसाई यांनी भाग घेतला तर सभेस मुख्याधिकारी सूरज सुर्वे, आरोग्य विभाग प्रमुख अमोल कांबळे, मानसी कदम(पाणी पुरवठा विभाग )प्रवीण बैले(बांधकाम विभाग )यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवकांचा प्रशासनाच्या कारभारावर जोरदार प्रहार
|