बातम्या

डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार

D Y Patil Management Department students


By nisha patil - 1/9/2026 10:56:26 PM
Share This News:



डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार

कुशिरे येथे ५०० हून अधिक बीज गोळ्यांची पेरणी

कोल्हापूर: देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा संदेश देत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन विभागातील फिटनेस क्लबतर्फे कुशिरे येथे निसर्ग ट्रेक आणि बीजगोळे निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ५०० हून अधिक बीजगोळे तयार करून परिसरात त्याची पेरणी केली. 

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक प्रसन्नता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश होता. निसर्गरम्य परिसरात ट्रेकचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक बीजगोळे तयार करण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी पोहाळे लेणी येथे भेट देत विद्यार्थ्यांनी परिसराचा नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसाही अनुभवला.

बीजगोळे तयार करण्यासाठी करंज, शेवगा, जांभूळ, सीताफळ, रामफळ, हिरडा आणि बेहडा यांसारख्या स्थानिक व देशी वृक्षप्रजातींच्या बियांचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः बीजगोळे तयार करून त्यांचे कुशिरे व परिसरातील निवडक योग्य ठिकाणी प्रसारण केले. या उपक्रमातून स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सहायक प्राध्यापक अभिजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगितली. बीजगोळ्यांचे पर्यावरणीय महत्त्व, देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनातील विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. रोहित लांडगे, डॉ.  पुरुषोत्तम पेटारे, डॉ.  मुग्धा देशपांडे, डॉ.  रेणुका तुरंबेकर, प्रा.  सागर जानराव, प्रा.  व्यंकटेश बडवे, प्रा.  अनिकेत परदेशी यांच्यासहित श्री. दीपक बंडागळे उपस्थित होते. 

या उपक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
 


डी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार
Total Views: 12