बातम्या

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेप

D Y Patil University s significant


By nisha patil - 4/9/2026 11:30:25 PM
Share This News:



डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेप
 

बीआयआरएसीकडून ५८.५१६ लाखांचे संशोधन अनुदान डॉ. दीपक सावंत यांचे ‘पेपर बेस्ड निदान’ प्रणालीवर संशोधन

कोल्हापूर :  क्षयरोग (टीबी) आणि त्यामुळे  होणाऱ्या मेंदूज्वराचे जलद, अचूक आणि किफायतशीर निदान करण्यासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने महत्त्वपूर्ण संशोधन हाती घेतले आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपक व्ही. सावंत यांच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत  पेपर बेस्ड टीबी निदान संशोधन प्रकल्पाला जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यता परिषद (बी.आय.आर.ए.सी) कडून  ‘ग्रँड चॅलेंजेस इंडिया’ योजनेतून ५८.५१६ लाख रुपयांचे संशोधन अनुदान मंजूर झाले आहे.  

टीबी हा गंभीर संसर्गजन्य आजार असून, त्याचे वेळीच आणि अचूक निदान होणे उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या निदानासाठी आवश्यक असलेल्या विविध तपासण्या, प्रयोगशाळा सुविधा आणि त्यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात, कमी साधनसामग्रीत आणि तुलनेने जलद निदान करता येईल अशी पेपर बेस्ड प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे.

‘टीबी आणि टीबी मेनिंजायटिसच्या सार्वत्रिक निदानासाठी बहुउपयोगी कागदावर आधारित व्यासपीठ’ या प्रकल्पाचे डॉ. सावंत हे प्रमुख संशोधक असून या संशोधनात डॉ. शिम्पा शर्मा, डॉ. सी. डी. लोखंडे  हे मार्गदर्शक तर माजी विद्यार्थिनी डॉ. सिद्धी सावंत या सहाय्यक आहेत. त्याचबरोबर येनपोया मेडिकल कॉलेज, मंगळुरू आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एआयआयएमएस), नागपूर या संस्थांचाही प्रकल्पात सहभाग आहे.  प्रकल्पातून कमी खर्चात, कमी साधनसामग्रीत आणि जलद निदान करता येईल अशी पेपर बेस्ड निदान प्रणाली विकसित केली जाणार आहे. 

निदान प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी झाल्यास टीबीचे लवकर निदान करून उपचार सुरू करण्यास मदत होऊ शकते. टीबी मेनिंजायटिसच्या निदानासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरेल,  विशेषत: प्रयोगशाळा व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मर्यादित असलेल्या भागांमध्ये या तंत्रज्ञानाचा फायदा होईल. या नाविन्यपूर्ण संशोधनातून परवडणारी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारी आरोग्यसेवा विकसित करण्याच्या दिशेने पाऊल  टाकण्यात आले असून ‘टीबीमुक्त भारत’ या राष्ट्रीय उद्दिष्टाला हे संशोधन बळ देणारे ठरेल,  असा विश्वास डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला. हे संशोधन माजी कुलगुरू प्रा. डॉ.  शिवाजीराव पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झाले. 

संशोधनाच्या व्यावसायिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
या प्रकल्पाला  संशोधनासाठी अनुदान मिळाल्याने नवे निदान तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर  विकसित होणाऱ्या निदान प्रणालीला प्रत्यक्ष वापरासाठी आणि व्यावसायिक स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. किफायतशीर आणि सहज वापरता येणारे तंत्रज्ञान विकसित झाल्यास भविष्यात व्यापक स्तरावर उपयोग होऊ शकतो.

या संशोधनाबद्दल व त्यासाठी मिळलेल्या अनुदानाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठात डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांनी डॉ. दीपक सावंत आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. 
 


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची टीबी निदान संशोधनात महत्त्वपूर्ण झेप
Total Views: 14