बातम्या
गणेशोत्सवापूर्वी KMT कर्मचाऱ्यांना न्याय द्या; रोहन अतिग्रे आक्रमक
By nisha patil - 10/9/2026 1:28:00 PM
Share This News:
गणेशोत्सवापूर्वी KMT कर्मचाऱ्यांना न्याय द्या; रोहन अतिग्रे आक्रमक
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील (KMT) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर प्रशासन सकारात्मक असून, संबंधित अधिकारी आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तातडीने योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मनपा उपायुक्त पारितोष कंकाळ यांनी दिले.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन समिती सदस्य रोहन अतिग्रे यांनी आज उपायुक्त पारितोष कंकाळ यांची भेट घेऊन KMT कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. गणेशोत्सवापूर्वी या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
KMT कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये मान्यताप्राप्त कामगार संघटनेसोबत झालेल्या बैठकीतील निर्णय व ठरावांची अंमलबजावणी, महासभेने मंजूर केलेल्या रोजंदार कर्मचाऱ्यांना प्रलंबित वेतनवाढ लागू करून वेतन फरकाची थकबाकी देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करून त्याचा फरक अदा करणे, पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची कार्यवाही करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे तसेच सेवानिवृत्ती उपदानासह इतर सेवा विषयक प्रश्नांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांच्या या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे रोहन अतिग्रे यांनी उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. KMT कर्मचारी हे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या प्रश्नांचे निराकरण झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी उपायुक्त पारितोष कंकाळ यांनी प्रशासन KMT कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला जाईल आणि त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष अमर क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवापूर्वी KMT कर्मचाऱ्यांना न्याय द्या; रोहन अतिग्रे आक्रमक
|