बातम्या

देवस्थान जमीनधारक शेतकरी व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा ९ मार्चला सांगली फाटा, शिरोली ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Devasthan land holding farmers and school nutrition staff march from Sangli Phata Shiroli to the District Collectors Office on March 9


By nisha patil - 5/3/2026 5:35:44 PM
Share This News:



देवस्थान जमीनधारक शेतकरी व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा ९ मार्चला सांगली फाटा, शिरोली ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


आजरा (हसन तकीलदार ) :- देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शालेय पोषण आहार योजनेतील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा व शालेय पोषण आहार संघटना यांच्या वतीने सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
    सोमवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी दहा वाजता हा मोर्चा शिरोली येथील सांगली फाटा येथून सुरू होऊन तावडे हॉटेल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीशी संबंधित जमीन कसणारे शेतकरी, खाजगी ट्रस्टच्या जमिनी कसणारे शेतकरी तसेच करवीर पीठाच्या जमिनी कसणारे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित कर्मचारीही या मोर्च्यात सहभागी होणार आहेत.

देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. शासनाने पूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार कायदा करून देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी, तसेच देवस्थान जमीन संदर्भातील कायद्याचा अंतिम मसुदा तयार करण्यापूर्वी किसान सभेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच सातबारा उताऱ्यावर कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे पुन्हा समाविष्ट करणे, चुकीने कमी केलेली नावे पूर्ववत करणे, करवीर पीठ ट्रस्टचे नाव चुकीने लागले असल्यास ते रद्द करणे आणि वारसा नोंदी करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

कडगाव (ता. भुदरगड) येथे कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थगिती आदेशानंतरही देवस्थान जमिनीवरील पिकांचे ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने नुकसान करण्यात आले, असा आरोप करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजनेचा लाभ, शासकीय योजनांचा लाभ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
शासनाने शेतकरी व शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या दोन संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. हे आंदोलन जबरदस्त प्रमाणात यशस्वी करावे असे आवाहन अखिल भारतीय किसान समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर, प्राचार्य ए. बी. पाटील, ‘माकप’चे कोल्हापूर जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम, कोल्हापूर शहर सचिव कॉ. विवेकानंद गोडसे, किसान सभेचे नेते नारायण गायकवाड, संभाजी मोहिते, दिनकर आदमापुरे, विकास पाटील, युवराज भोसले, बाळासाहेब कामते, चंद्रकांत कुरणे,कॉ.संग्राम सावंत, शिवाजी गिलबिले, मलगोंड पाटील, भीमराव देसाई, एन.वाय.जाधव आदींनी केले आहे.


देवस्थान जमीनधारक शेतकरी व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा ९ मार्चला सांगली फाटा, शिरोली ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Total Views: 108