बातम्या
पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By Administrator - 6/3/2026 10:55:24 AM
Share This News:
पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता; वृक्षलागवड, स्वच्छता, अन्नछत्र व भाविकांसाठी आधुनिक सुविधा उभारणार
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या डोंगर परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता मंदिर परिसराचा विकास पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकासाचा एकूण आराखडा २५० कोटी रुपयांचा असून त्यापैकी ८० कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. उर्वरित १७० कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन मंत्री गणेश नाईक, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्योतिबा डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात यावी तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा. डोंगर परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवावे. मंदिर परिसरात अनेक भाविक अन्नदान करत असल्याने त्यासाठी मोठ्या क्षमतेचे अन्नछत्र उभारण्यात यावे.
याशिवाय डोंगर परिसरातील वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थापन, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्वच्छतेचे काटेकोर नियोजन आणि वनजमिनीचे नियमानुसार हस्तांतरण करून विकासकामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विकास आराखड्यानुसार ज्योतिबा डोंगरावरील जुन्या पायवाटांचे दुरुस्ती व रुंदीकरण, बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, पोलीस कक्ष व देवस्थान व्यवस्थापन कार्यालय उभारणे, यमाईदेवी मंदिर परिसरात भाविकांसाठी सुविधा केंद्र उभारणे, दक्षिणद्वार प्रवेश मार्गाची दुरुस्ती तसेच शाहूकालीन हुजूरवाडा इमारतीचे संवर्धन करण्यात येणार आहे.
तसेच कुशीरे ते गायमुख तलाव परिसरात पार्किंगसह पादचारी मार्गाचा विकास, पाच मेगावॉट क्षमतेचे वीज उपकेंद्र व सौर ऊर्जा प्रकल्प, भाविकांसाठी निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा कक्ष, अन्नछत्र आणि वाडी रत्नागिरी गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याचाही या आराखड्यात समावेश आहे.
पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
|