बातम्या
खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील दोन खासगी रुग्णालयांचा समावेश
By nisha patil - 7/17/2026 7:08:33 PM
Share This News:
खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील दोन खासगी रुग्णालयांचा समावेश
कोल्हापूर, दि. १७ : खासदार धनंजय महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्रीय शासकीय आरोग्य योजना (सीजीएचएस) अंतर्गत कोल्हापुरातील दोन खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक पातळीवरच मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोल्हापुरात सीजीएचएसची सुविधा नसल्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई गाठावी लागत होती. यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याने अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे ही सुविधा कोल्हापुरात उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत खासदार महाडिक यांनी संसदेत तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. २१ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल शिंदे, संजय पठाडे आणि राजेश सारंग यांच्या शिष्टमंडळासह तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली. त्यानंतर २ मे २०२३ रोजी संसदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, छत्रपती ताराराणी चौक येथील सेलक्युअर कॅन्सर सेंटर आणि शिवाजी पार्क येथील सनराईज हॉस्पिटल यांचा सीजीएचएस योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना या रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आनंद भोगडे, मोरेश्वर देशपांडे, अभिलाष पोवार, गोपाळ देशपांडे, वल्लभ मैंदरकर, राजेंद्र पाटील, आनंद बुगडे, ज्योत्स्ना माकणकर, देवेंद्र कवडे, साक्षी बचाटे, प्रतीक्षा पाटील आणि रूपाली तांबवेकर उपस्थित होते.
खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील दोन खासगी रुग्णालयांचा समावेश
|