बातम्या
राधानगरी तालुक्यातील १,३७५ लाभार्थ्यांना विविध पेन्शन योजनांच्या अनुदान मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप
By nisha patil - 10/8/2026 12:49:40 PM
Share This News:
राधानगरी तालुक्यातील १,३७५ लाभार्थ्यांना विविध पेन्शन योजनांच्या अनुदान मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप
कागल प्रतिनिधी अजित बोडके राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधील तब्बल १ हजार ३७५ लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप आरोग्य व पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमानपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना पालकमंत्री आंबिटकर म्हणाले, “शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात आश्वासक बदल घडवणे, हेच आमचे ध्येय आहे. एकही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.
नरतवडे येथे आयोजित कार्यक्रमात राधानगरी तालुक्यातील मोठ्या संख्येने लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.
याप्रसंगी शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, शरद सहकारी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन अशोकराव फराकटे, संजय गांधी निराधार समितीचे राधानगरी अध्यक्ष दीपक शेट्टी, प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, शरद सहकारी सूतगिरणी संचालक सुभाष चौगुले (बापू), शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी चौगुले यांच्यासह नवनियुक्त सदस्य दीपक पाटील, तुकाराम कुंभार, सुभाष पाटील, संदीप पाटील, सुभाष जाधव, संतोष पाटील, प्रल्हाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
राधानगरी तालुक्यातील १,३७५ लाभार्थ्यांना विविध पेन्शन योजनांच्या अनुदान मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप
|