बातम्या
पुन्हा हत्ती.. आजरा तालुक्यातील पश्चिम भागात भीतीचे सावट
By nisha patil - 8/6/2026 1:16:44 PM
Share This News:
पुन्हा हत्ती.. आजरा तालुक्यातील पश्चिम भागात भीतीचे सावट
आजरा(हसन तकीलदार)*:-शेतकऱ्यांना चौफेर संकटाचा सामना करावा लागत आहे. चौफेर संकटामुळे शेतकरी शेती करण्यास उदासीन दिसत आहे. पिकवलंच नाही तर खाणार काय? पोशिंदा जगला पाहिजे. परंतु सरकारने याकडे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. रानडुकरे, माकडे, गवेरेडे पाठोपाठ हत्तीचा शिरकाव झाल्यामुळे आजऱ्याच्या पश्चिम भागातील धनगरवाडा आणि घाटकरवाडी परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
आजरा तालुक्यातील पश्चिम भागात हत्तीचा प्रवेश झाल्यामुळे धनगरवाडा आणि घाटकरवाडी परिसरात गेल्या आठ दहा दिवसापासून परिसरातील लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. टस्कर हत्तीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतातील पिकासह मेसकाठी, फळझाडे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सायंकाळनंतर हत्ती आपले दर्शन देत असल्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. यापूर्वी अनेकवेळा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आपल्या कुटुंबातील कमवत्या सदस्यांना गमवावे लागल्याने जीव मुठीत घेऊन तेथील लोकांना जगावे लागत आहे. या वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून तेथील काही शेतकरी रस्त्यासाठी जमीन जाऊ दे किमान आम्हाला जमिनीचा मोबदला तरी मिळेल अशी मानसिकता तयार करून घेतलेली दिसतात तर काही जण ही आमच्या बापदादाची शेतजमीन आहे. एक ना एक दिवस सरकार बदलेल, चांगले दिवस येतील, पुन्हा शेतीसाठी सुवर्ण काळ येईल. आमच्या वाडवडलांची जमीन आम्ही देणार नाही. असे म्हणताना दिसतात. सातेवाडी, खानापूर, कासारकांडगाव, सिरसंगी या भागातील काही शेतकऱ्यांनी तर वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतजमीन चक्क पड पाडली आहे. पिके घेणे बंद केले आहे. अशीच अवस्था राहिली तर एक दिवस शेती ओस पडून अन्नधन्याला सर्वसामान्य माणूस मुकल्याशिवाय राहणार नाही. माणूस अन्नाला महाग होईल अशी परिस्थिती येईल.वनखात्याकडून मिळणारी नुकसान भरपाईही तुटपुंजी मिळते. जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देताना वन खात्याचे निकष व अटी पाहून सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत जायला धजावत नाही.
हत्तीबरोबर अन्य वन्यप्राणीही त्रास देत असून अशा वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील काही संघटना व शेतकऱ्याकडून होताना दिसत आहे. वनविभागाने ठोस उपाययोजना राबवून हत्तीबरोबर इतर वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करणे काळाची गरज बनली आहे. लाखो करोड रुपये नको असलेल्या महामार्गाला खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आणि वन संवर्धनाला लावून वन्य प्राण्यांचा बंदोबस्तासाठी वापरले तर काय हरकत आहे असेही काहींचे मत आहे.
पुन्हा हत्ती.. आजरा तालुक्यातील पश्चिम भागात भीतीचे सावट
|