बातम्या
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
By nisha patil - 3/9/2026 11:23:35 PM
Share This News:
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
कोल्हापूर, ता.३ : पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करून जलस्रोतांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रकल्पाची कार्यपद्धती, सांडपाणी प्रक्रिया, स्वयंचलित यंत्रणा, प्रयोगशाळेतील तपासणी तसेच स्लज व्यवस्थापनाची माहिती त्यांना देण्यात आली.
शहरातील जयंती नाला, बापट कॅम्प नाला आणि लाईन बाजार नाला येथून येणाऱ्या सांडपाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प PPP पद्धतीने राबविण्यात आला आहे.
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रकल्पाची कार्यक्षमता, जैविक प्रक्रिया, स्वयंचलन, प्रयोग शाळेतील देखरेख याबाबत प्रयोग शाळेची माहिती घेतली. जलप्रदूषण नियंत्रण, पंचगंगा नदीचे संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी आवश्यक मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी प्रक्रिया करण्यात येणाऱ्या प्लॅन्टवर जाऊन समक्ष पाहणी केली.
या ७६ एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक एस.बी.आर. (Sequential Batch Reactor) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये एका टँकमध्ये 180 मिनिटांची प्रक्रिया होते. या प्रक्रियेमध्ये टँकमध्ये सांडपाणी सोडले जाऊन यामध्ये ब्लोअर द्वारे ऑक्सिजन मिसळणे, त्यानंतर सांडपाणी स्थिरावणे व त्यानंतर प्रक्रिया झालेले सांडपाणी डिकेंटरद्वारे क्लोरिनेशनसाठी क्लोरिन टँकमध्ये जाते. या प्रकल्पात 6 एस.बी.आर टँक असून याचे नियोजन पी.एल.सी.(स्काडा) द्वारे स्वयंचलित नियंत्रण होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया केलेले पाणीचे क्लोरीनेशन होऊन निर्जंतूकीकरण होते.
यावेळी आमदार अमल महाडीक, महापौर सौ.रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, जल अभियंता हर्षजीत घाटगे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, शहर समन्वयक हेमंत काशीद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल खरात, विश्वा इन्फ्रास्ट्रक्चरचे पवन कुमार व कर्मचारी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी
|