बातम्या
जागतिक पर्यावरण दिनाचा महासंकल्प सरपंच परिषद आजरा तालुक्यात तब्बल ३ हजार जांभूळ रोपांची करणार लागवड
By nisha patil - 3/6/2026 10:52:02 PM
Share This News:
जागतिक पर्यावरण दिनाचा महासंकल्प सरपंच परिषद आजरा तालुक्यात तब्बल ३ हजार जांभूळ रोपांची करणार लागवड
आजरा(हसन तकीलदार)**:-वाढते तापमान आणि हवामान बदलाच्या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी आता ग्रामीण भारताने कंबर कसली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न आजरा तालुक्याला पुन्हा एकदा हिरवेगार करण्यासाठी आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे (५ जून) औचित्य साधून तब्बल तीन हजार जांभूळ रोपांची लागवड करण्याचा एक स्तुत्य आणि भव्य संकल्प करण्यात आला आहे.
'सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र' या अग्रगण्य संघटनेने या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व हाती घेतले असून, ५ जूनपासून या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शानदार प्रारंभ होणार असल्याची अधिकृत माहिती सरपंच परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.यंदाच्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आजरा तालुक्यासाठी एक वरदान ठरणार असून या आदर्शवत कार्याचे अनुकरण करणे अपेक्षित आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि पर्यावरणाचा समतोल यंदाच्या उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्र आणि पर्यायाने आजरा तालुक्यालाही तीव्र उन्हाच्या झळा आणि अभूतपूर्व उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला आहे. आजपर्यंत न अनुभवलेला उष्मा आजरेकर अनुभवत आहेत.हवेतील वाढत्या उष्णतेमुळे नागरिक आणि मुके प्राणी दोघेही होरपळून निघाले आहेत.. जंगलांमधील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे आणि झाडांची संख्या कमी झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालल्याचे चित्र समोर आले आहे. आजरा आंबोली रोडवरील शंभर दीडशेहे वर्षांपूर्वीची, आंबा, फणस, शिसम, पळस, जांभूळ, सावर यासारखी देशी झाडे तोडली गेल्याने निसर्गाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.या गंभीर परिस्थितीवर केवळ चर्चा न करता थेट कृती करण्याचा निर्णय सरपंच परिषदेने घेतला आहे.
तालुक्यातील वाढते काँक्रिटीकरण आणि अमर्याद वृक्षतोड यावर मात करण्यासाठी केवळ शोभेची झाडे न लावता, स्थानिक पर्यावरणाला पूरक असणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वृक्षांची निवड करणे गरजेचे आहे . याच विचारातून यंदा आजरा तालुक्यातील विविध मुख्य रस्ते, गावांमधील मोकळ्या आणि पडिक जागा, शासकीय गायराने, तसेच खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनींवर शास्त्रीय पद्धतीने खड्डे मारून ३ हजार जांभूळ रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत स्थानिक ग्रामपंचायती, युवक मंडळे आणि महिला बचत गटांनाही मोठ्या प्रमाणावर सामावून घेतले जाणार असलेबद्दल सांगण्यात आले.
आजच्या काळात वृक्षारोपण करताना अनेकदा विदेशी किंवा शोभेची झाडे लावली जातात, ज्यांचा स्थानिक पक्षी किंवा प्राण्यांना काहीही फायदा होत नाही. मात्र, सरपंच परिषदेने अत्यंत जाणीवपूर्वक 'जांभूळ' या पूर्णपणे देशी प्रजातीच्या वृक्षाची निवड केली आहे. या निवडीमागे एक मोठे पर्यावरणशास्त्र आणि मानवी आरोग्याचे गणित दडलेले आहे. आजरा तालुका हा वनक्षेत्राने वेढलेला भाग आहे. येथील जंगलांमध्ये माकड, खारुताई, ससे, भेकर, सांबर, कोल्हे यांसारखे शाकाहारी व जंगली प्राणी आणि शेकडो प्रजातींचे पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. जांभळाची झाडे या सर्व प्राण्यांसाठी उत्तम अन्नछत्र ठरतात. जंगलात अन्न मिळाल्यामुळे वन्यजीव मानवी वस्तीकडे किंवा शेतीकडे धाव घेणार नाहीत, ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येईल.त्याचप्रमाणे जांभूळ हे फळ मानवी शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. आयुर्वेदामध्ये जांभळाच्या बिया, पाने आणि फळाचा वापर विविध आजारांवर, विशेषतः मधुमेहावर रामबाण उपाय म्हणून केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत मानवी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याचे आणि शरीराला शीतलता देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम जांभूळ करते. देशी वृक्षांची मुळे जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण करण्यास मदत करतात. जांभळाची झाडे जमिनीची धूप थांबवतात आणि भूजल पातळी वाढवण्यास मदत करतात.
जांभूळ हा पूर्णपणे आपल्या मातीतील देशी प्रजातीचा वृक्ष आहे. त्याचे अनेक आयुर्वेदिक उपयोग तर आहेतच, पण त्याचसोबत माकड, खारुताई, पक्षी आणि मानवालाही ते उत्तम खाद्य पुरवते. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी हे फळ अतिशय उपयुक्त आहे. म्हणूनच, निसर्गाची साखळी टिकवण्यासाठी आम्ही याच्या लागवडीवर सर्वाधिक भर देत आहोत असे मत जी. एम. पाटील (कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र यांनी सांगितले.यंदाच्या लागवडीचे सर्वात मोठे आणि मुख्य आकर्षण म्हणजे 'जांभूळ मार्ग' ची निर्मिती! कोकण आणि गोव्याला जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग असलेला संकेश्वर-बांदा महामार्ग आजरा तालुक्यातून जातो. या महामार्गाचा प्रवास अधिक आल्हाददायक आणि निसर्गरम्य करण्यासाठी एक विशेष योजना आखण्यात आली आहे.
आजरा येथील सूतगिरणी परिसरापासून ते पुढे महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर जांभळाच्या रोपांची सलग लागवड केली जाणार आहे. भविष्यात जेव्हा ही झाडे मोठी होतील, तेव्हा हा संपूर्ण पट्टा एका घनदाट आणि सावली देणाऱ्या 'जांभूळ मार्ग' म्हणून ओळखला जाईल. यामुळे केवळ महामार्गाचे सौंदर्यच वाढणार नाही, तर प्रवाशांना कडक उन्हात सावली आणि प्रवासादरम्यान ताजी फळेही उपलब्ध होऊ शकतील. हरित महामार्ग (Green Highway) बनवण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत पुढचे पाऊल मानले जात आहे.
५० टक्क्यांहून अधिक झाडे जगवण्यात यश केवळ फोटो काढण्यापुरते किंवा रेकॉर्ड करण्यासाठी वृक्षारोपण करायचे आणि नंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष करायचे, असा प्रघात अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र, सरपंच परिषदेचे काम केवळ लागवडीपुरते मर्यादित नाही, तर ती झाडे जगवण्यावर त्यांचा मुख्य भर आहे.
गतवर्षीचा (२०२५ चा) अहवाल पाहिला तर, सरपंच परिषदेने आजरा सूतगिरणी परिसर आणि तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तब्बल १० हजार जांभूळ रोपांची लागवड केली होती. केवळ झाडे लावून ते थांबले नाहीत, तर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना पाणी घालण्याची आणि जनावरांपासून संरक्षण करण्याची व्यवस्था केली गेली. याचे फलित म्हणून आज त्या १० हजारांपैकी ५ ते ६ हजार झाडे उत्तम प्रकारे जगली असून ती मोठी होत आहेत. एका ग्रामीण भागात ५० ते ६० टक्के झाडे जगवणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. याच यशस्वी अनुभवाचा आणि आत्मविश्वासाचा आधार घेऊन यंदा अधिक ताकदीने ३ हजार नवीन रोपे लावण्यात येत आहेत. सरपंच परिषदेने घेतलेला हा ३ हजार जांभूळ झाडांचा संकल्प केवळ एका संघटनेचा किंवा शासनाचा राहिलेला नाही, तर तो आता आजऱ्याच्या लोकचळवळीचा भाग बनत आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या मोहिमेला वाजत-गाजत सुरुवात केली जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक सुजाण नागरिकाने, तरुणाने आणि शेतकऱ्याने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचा महासंकल्प सरपंच परिषद आजरा तालुक्यात तब्बल ३ हजार जांभूळ रोपांची करणार लागवड
|