बातम्या

 डी.वाय. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘युरेका’ उद्योजकीय पिच स्पर्धा उत्साहात

Eureka Entrepreneurial Pitch Competition


By nisha patil - 7/9/2026 5:48:43 PM
Share This News:



नाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या –डॉ. राकेश कुमार शर्मा
 

 डी.वाय. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘युरेका’ उद्योजकीय पिच स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर :  सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नाविन्यपूर्ण विचार, कौशल्यविकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन आत्मसात करून उद्योगक्षेत्रातील नवनवीन संधीचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ई-सेलतर्फे आणि आयआयटी बॉम्बे नॅशनल आंत्रप्रेन्युअरशिप चॅलेंज २०२६ अंतर्गत आयोजित ‘युरेका – उद्योजकीय पिच स्पर्धे’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप संस्कृती आणि सर्जनशीलता रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत ५७ संघांमधील २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या नावीन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना सादर केल्या.
डॉ. राकेश शर्मा यांनी उद्योग क्षेत्रातील बदलते प्रवाह, औद्योगिक क्षेत्रातील प्रगती आणि भविष्यातील संधी यावर विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी बदलत्या औद्योगिक वातावरणाशी जुळवून घेत नाविन्यपूर्ण विचार, कौशल्यविकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन आत्मसात करण्याचे आवाहन केले. 

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी उद्योगाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये उद्योगक्षेत्राची असलेली भूमिका अधोरेखित केली.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना व स्टार्टअप संकल्पना सादर करण्यात आल्या. नावीन्यपूर्णता, व्यवहार्यता, बाजारपेठेतील क्षमता, व्यवसाय मॉडेल आणि सादरीकरण कौशल्य या निकषांवर ७ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.  युथकी मंत्रा सर्व्हिसेसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सूर्य, सेंट झेवियर्स हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक व एनसीसी अधिकारी अँथनी एस. डिसोझा, झेनिथ करिअर अकॅडमी, पेठ वडगावच्या संचालिका डॉ. माधवी रणजित सावंत आणि हाय फाईव्ह ए. आय., कोल्हापूरचे प्रादेशिक प्रमुख प्रवीण शर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. 

या स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने प्रथम क्रमांक, डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, तळसंदेने  द्वितीय, तर डॉ. सायरस पूनावाला स्कूल, वडगावने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सागर जानराव यांनी केले. कार्यक्रमास स्कूल ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन अँड बिझनेस अडमिनीस्ट्रेशनचे संचालक  डॉ. ए. एम. गुरव  सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


 डी.वाय. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘युरेका’ उद्योजकीय पिच स्पर्धा उत्साहात
Total Views: 38