बातम्या
सैनिक टाकळी एमआयडीसी प्रश्नी माजी सैनिक व शेतकऱ्यांची खासदार राऊत यांच्याकडे धाव
By nisha patil - 4/9/2026 11:27:34 PM
Share This News:
.माजी सैनिक-शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास ‘उबाठा’ गप्प बसणार नाही : खा. संजय राऊत....... ...........
सैनिक टाकळी एमआयडीसी प्रश्नी माजी सैनिक व शेतकऱ्यांची खासदार राऊत यांच्याकडे धाव.........,.........................
कोल्हापूर : प्रतिनिधी, आचिन हेरवाडे सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी माजी सैनिक व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ग्रामस्थांनी प्रस्तावित एमआयडीसीमुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांचा पाढा राऊत यांच्यासमोर मांडत तीव्र भावना व्यक्त केला.
सैनिक टाकळी परिसरातील जमीन ही माजी सैनिक शेतकरी, स्थानिक शेतकरी तसेच पूरग्रस्तांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. असे असतानाही स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध या परिसरात एमआयडीसी लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकरी व माजी सैनिकांनी केला. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एमआयडीसीविरोधात निवेदन देण्यासाठी गेलेल्या माजी सैनिक व शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलावून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोपही शिष्टमंडळाने खासदार राऊत यांच्यासमोर केला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हा गंभीर प्रश्न थेट राज्यपालांच्या निदर्शनास आणून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
माजी सैनिक व शेतकऱ्यांची भूमिका सविस्तर ऐकून घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. “हा प्रश्न माझ्या कानावर आला आहे. देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांवर आणि अन्नदात्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर शिवसेना (उबाठा) गप्प बसणार नाही. हा विषय पक्षाच्या माध्यमातून जोरदारपणे मांडून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू,” असे आश्वासन राऊत यांनी दिले.
खा. राऊत यांच्या या भूमिकेमुळे सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधातील लढ्याला राजकीय पाठबळ मिळाले असून, माजी सैनिक व शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता शासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या भेटीदरम्यान शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, संजय पवार, अमोल चौगुले, ‘आंदोलन अंकुश’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक पाटील, निवृत्त लेफ्टनंट विजय गायकवाड, कॅप्टन प्रकाश खोत, वायुसैनिक अमर पाटील, मधुकर पाटील, श्रीधर भोसले, नवनाथ पाटील, विजय पाटील, अमर वासमकर, गोपाळ चव्हाण, राजे आवळे, अजित खोत यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक व शेतकरी उपस्थित होते...
सैनिक टाकळी एमआयडीसी प्रश्नी माजी सैनिक व शेतकऱ्यांची खासदार राऊत यांच्याकडे धाव
|