बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या क्रीडा साहित्याचे प्रदर्शन
By nisha patil - 2/9/2026 3:05:39 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या क्रीडा साहित्याचे प्रदर्शन
कोल्हापूर दि. 02 : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये़ भारताला वैयक्तिक कुस्ती क्रीडाप्रकारात पहिले ब्रांझ पदक मिळवून देणारे ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या क्रीडा साहित्य, फोटो , वर्तमानपत्रातील त्यांच्यावर आलेले लेख, साहित्य इत्यादीचे प्रदर्शन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित करण्यात आले होते.
29 ऑगस्ट या क्रीडा दिनाचे औचित्य् साधून हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद एस. हुजरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंचा फेटे बांधून व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रीय खेळाडू श्लोका शिंदे (फेन्सिंग) वैष्णवी कुशाप्पा (कुस्ती) श्रीनंदन मालपाणी (योगा) श्रीवर्धन पाटील (जलतरण) नेहाली पाटील (टेबल टेनिस) यांचा सत्कार करण्यात आला. यातील श्रीनंदन मालपाणी याने योगाच्या प्रात्यक्षिकातून गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व संस्था प्रार्थनेने करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीची आवड निर्माण करणे, नियमित व्यायाम व खेळाचे महत्त्व पटवून देणे , शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित करणे , युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे या उद्देशाने यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे त्यांचा आदर्श इतर खेळाडूंनी घ्यावा व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष कुंडले यांनी केले तर आभार प्रा. प्रशांत कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागातील सर्व प्राध्यापक, श्री सुरेश चरापले, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार यांचे विशेष सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या क्रीडा साहित्याचे प्रदर्शन
|