बातम्या
नातीगोती हरपत चाललेल्या युगात प्रेरणादायी कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन*
By nisha patil - 8/5/2026 7:40:39 PM
Share This News:
*नातीगोती हरपत चाललेल्या युगात प्रेरणादायी कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन*.
*आजरा(हसन तकीलदार)*:-नातीगोती, एकत्र कुटुंब पद्धत आणि गोतावळा जपण्याची आमच्या भारतीय संस्कृतीचा ठेवा आजच्या युगात लोप पावत आहे. डिजिटल आणि या धावत्या युगात नाती जपणं म्हणजे एक स्वप्नवत ठरत असताना कोकितकर आणि त्यांच्या गोतावळ्याने एक अनोखा आणि आदर्शवत उपक्रम राबवला आहे.सर्वजण एकत्र येत नाती जपण्याचा सोहळा साजरा करीत आहेत.
हिरण्यकेशी नदीच्या पाण्यावर हिरवीगार पिकलेली ऊस शेती, एका बाजूला असणारी काजूची बाग, तर दुसऱ्या बाजूला असणारी केळीची बाग, त्यामध्येही फळाने बहरलेली आंबा आणि फणसाची झाडे उंबरवाडी येथील निसर्ग रम्य परिसरातील आनंददायी संध्याकाळ, साऊंड सिस्टिम मधील कानाला गोड वाटणारी सनई वादनाची धून,अधून मधून गार वाऱ्याची झुळूक सहभागी झालेल्या बाल चमू , महिला वर्गापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच उत्साह देत होती. हा कार्यक्रम म्हणजे कुणाचा वैयक्तिक सोहळा नव्हता, तर हारूर ता.आजरा येथील कोकितकर व त्यांच्या वंशावळीतील नातेवाईकांनी एकत्र येऊन केलेला कौटुंबिक सोहळा होता.
कोकितकर कुटुंबाच्या वंशावळीतील शिवाजी गोरुले, मिलिंद पालकर व प्रवीण कळसकर यांच्या पुढाकारातून मागील दोन तीन वर्षापासून हा सोहळा साजरा केला जात आहे असे त्यांनी सांगितले.सध्याच्या धावपळीच्या युगात व डिजिटल क्रांतीत कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त होते की काय अशी भीती निर्माण होत आहे. कारण कुटुंबातील नात्या नात्यांमध्ये भावना उरल्या नाहीत. संवाद संपत चालला आहे.नात्यातील प्रेमभावना, आदर,एकमेकाबद्दलची आत्मीयता,ओढ,माया प्रेम कमी होत आहे.
बारीक सारीक आणि साध्या गोष्टीवरून एकमेकांच्या बद्दल फक्त द्वेष , मत्सर, अहंकार यामध्ये वाढ होत आहे आणि हे कुटुंब व्यवस्थेसाठी घातक आहे. एकत्र कुटुंब पद्धत लोप पावली आहे.त्यामुळे प्रथम कुटुंब मग समाज आणि मग देश अशी आपल्या राष्ट्राची बांधणी होत असते. राष्ट्राच्या संस्कृतीची श्रीमंती म्हणजेच कुटुंब व्यवस्था होय. यासाठी कुटुंब व्यवस्था सुसंस्कृत आणि बळकट होणे काळाची गरजेचे आहे या विचाराने कोकितकर कुटुंबीय या कौटुंबिक स्नेह सोहळ्याचे आयोजन करीत आले आहेत . या कौटुंबिक स्नेह सोहळ्यामध्ये कोकितकर कुटुंबीयांच्या या विचाराला व उद्देशाला गुंफुन ठेवण्यासाठी प्रसिद्ध निवेदक रमेश देसाई यांनी आपल्या बहारदार निवेदनाने रंगत आणली.
महिलांच्या साठी हळदी कुंकू, फनी गेम्स ,लकी ड्रॉ, मजेदार खेळ घेऊन मनोरंजन बरोबर प्रबोधन करत होते. राष्ट्रगीताने स्नेह सोहळ्याची सुरुवात केली. स्नेहभोजनानंतर सांगता झाली.कोकितकर वंशावाळीचा हा अनोखा उपक्रम समाजाला एक आदर्श आणि प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.
नातीगोती हरपत चाललेल्या युगात प्रेरणादायी कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन*
|