बातम्या
म्हैशाळ बंधाऱ्यामुळे बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न; पाटबंधारे-महसूल विभागाची संयुक्त बैठक २५ रोजी
By Administrator - 3/23/2026 3:06:27 PM
Share This News:
म्हैशाळ बंधाऱ्यामुळे बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न; पाटबंधारे-महसूल विभागाची संयुक्त बैठक २५ रोजी
सांगली : कृष्णा नदीवरील म्हैशाळ बंधाऱ्या प्रकल्पाच्या कामामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अखेर संयुक्त बैठकीचे आश्वासन दिले आहे. पाटबंधारे, महसूल आणि पोलीस प्रशासनाची ही बैठक बुधवार, २५ तारखेला आयोजित करण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सांगली पाटबंधारे विभागाकडून सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामादरम्यान ठेकेदाराने नदीपात्रात टाकलेल्या चुकीच्या मातीच्या बांधामुळे कनवाड हद्दीतील शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. तसेच नुकसान झालेल्या जमिनीच्या संरक्षणासाठी बांधकाम करावे, अशी मागणीही शेतकरी करत आहेत.
याशिवाय बंधाऱ्याच्या कामासाठी तयार करण्यात येणाऱ्या पोहोच रस्त्यांमुळे बाधित जमिनीचे भूसंपादन अद्याप पूर्ण झाले नसल्याने, तातडीने भूसंपादन करून योग्य मोबदला द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात स्वच्छ पाणी मिळावे यासाठी धरणात राखीव साठा ठेवण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
या सर्व मागण्यांसाठी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला; मात्र त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडत आंदोलन सुरूच ठेवले.
ठरल्याप्रमाणे बैठक न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत Andolan Ankush Sanghatana च्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात प्रभारी तहसीलदार खिल्लारी यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदारांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत बुधवार, २५ रोजी संबंधित तिन्ही विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
म्हैशाळ बंधाऱ्यामुळे बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न; पाटबंधारे-महसूल विभागाची संयुक्त बैठक २५ रोजी
|