बातम्या
द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार डॉ. कांगो यांच्या हस्ते शाहीर संभाजी भगत यांना प्रदान
By nisha patil - 3/5/2026 2:04:49 PM
Share This News:
**द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार डॉ. कांगो यांच्या हस्ते शाहीर संभाजी भगत यांना प्रदान **
**आजरा(हसन तकीलदार)*:-दरवर्षी प्रमाणे यावर्षीही द.ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गव्हाणकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे शाहीर संभाजी भगत यांना ज्येष्ठ विचारवंत आणि भाकपचे केंद्रीय नेते डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई हे होते. स्वागत युवराज पोवार यांनी केले. तर प्रास्ताविक संपतराव देसाई यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मुकुंद देसाई म्हणाले की, आजची परिस्थिती पाहिली तर देशाची अवस्था फार बिकट आहे. भीती निर्माण करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशाची वाटचाल लोकशाही सोडून हुकूमशाहीकडे सुरु आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे. आजऱ्यात गव्हाणकर यांचे स्मृती दालन उभे करण्याचा मानस आहे. यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
त्यानंतर प्रास्ताविकात कॉ.संपत देसाई देसाई म्हणाले की, लोकशाहीर गव्हाणकर यांनी जातीपातीच्या बाहेर जाऊन बहुजनासाठी काम केले. त्यामुळे ते दोन्ही कडून उपेक्षितच राहिले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण रहावी, त्यांचे कार्य विचार नव्या पिढीसमोर जावे यासाठी लोकशाहीर गव्हाणकर स्मृती पुरस्काराचे दरवर्षी आयोजन केले जाते.
आज लोकशाही टिकवण्याचे आव्हान देशासमोर आहे. देशात खऱ्या आणि मूलभूत प्रश्नावरून नाही तर धर्म आणि जाती पाहून मतदान केले जाते. त्यामुळे लोकशाहीचा उद्देश सफल होताना दिसत नाही. देशात भीती घालून राज्य केले जात आहे. मुगलांनी 700 वर्षे,ब्रिटिशांनी दीडशेहे वर्षे राज्य केले असं सांगून धर्माच्या नावावर राज्य केलं जात आहे. देशातील कलाकारांनी, शाहिरांनी, लेखकांनी, कवीनी आपली लेखणी, आपली कला वापरली पाहिजे आणि देशातील लोकशाही टिकवली पाहिजे. समाजात वर्चस्ववाद वाढत आहे. खोटा राष्ट्रवाद फोफावत आहे याला रोखयचे असेल तर सांस्कृतिक राजकीय चळवळ वाढवली पाहिजे. जनजागृती केली पाहिजे. यासाठी सर्व स्तरावर कलाकार एकवटले पाहिजे. देशात लोकशाही पद्धतीने क्रांती झाली पाहिजे असे डॉ. भालचंद्र कांगो यांनी सांगितले.
तर पुरस्कार प्राप्त संभाजी भगत म्हणाले की, ज्या महामानवानी आम्हा तुम्हाला माणसात आणलं त्यांना वंदन करतो.ज्यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आजचा काळ हा ब्रिटिशांच्या पेक्षाही वाईट काळ आहे. आजूबाजूला जे चाललंय ते माणुसकीला काळिमा फसणारे आहे. सांस्कृतिक राजकारणाचा समाजमानसावर काय परिणाम होतो याची चर्चा होणे गरजेचे आहे. सांस्कृतिक सत्तेचा पाया नसलेली सत्ता नीट पक्व नसते. सांस्कृतिक राजकारणाचा विचार करणारे कार्यकर्ते तयार करणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ. राजन गवस, प्रा. डॉ. आनंद मेणसे, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, उदयराज पोवार, प्रा. मीना मंगरूळकर, पुष्पलता घोळसे, गीताताई पोतदार, डॉ. धनाजी राणे, राजू होलम, रणजित देसाई, कॉ. शिवाजी गुरव, कॉ. संजय तर्डेकर, रवींद्र भाटले, अरविंद बारदेस्कर, संजयभाऊ सावंत, संभाजी बापट, मनोहर गव्हाणकर, मायकेल फर्नांडिस, कॉ. काशिनाथ मोरे, विक्रम देसाई, कृष्णा सावंत, सुनील पाटील (पत्रकार ), अमित सामंत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन एकनाथ गिलबिले यांनी केले तर आभार कॉ. संजय घाटगे यांनी मानले.
द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार डॉ. कांगो यांच्या हस्ते शाहीर संभाजी भगत यांना प्रदान
|