बातम्या
दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांना मताचा थेट अधिकार मिळावा यासाठी जाहीर मेळावा संपन्न*
By nisha patil - 10/8/2026 11:12:09 PM
Share This News:
**दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांना मताचा थेट अधिकार मिळावा यासाठी जाहीर मेळावा संपन्न*
**जे काढतात दुधाची धार त्यालाच पाहिजे मतदानाचा अधिकार -कॉ. संपत देसाई*
**आजरा(हसन तकीलदार)*:-कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळ संस्थेची निवडणूक येऊ घातली आहे. या निवडणूकीसाठी गावागावातून दूध संस्थांचे ठराव मतदान म्हणून गोळा केले जात आहेत आणि यातूनच घोडेबाजार सुरु आहे. जर हा घोडेबाजार थांबवायचा असेल तर दूध उत्पादक सभासदाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीने निवडणूक होईल म्हणून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांना मताचा थेट अधिकार मिळावा तसेच इतर काही मागण्यासाठी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात आज दि. 10ऑगस्ट 2026 रोजी सभासद व दूध उत्पादक सभासदांचा जाहीर मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. संपत देसाई होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश शिंगटे (सर ) यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कॉ. संपत देसाई म्हणाले की, आजऱ्यातून प्रत्येक चळवळीची सुरवात होते आणि ती चळवळ राज्यव्यापी बनते. पुढे जाऊन ही चळवळ व्यापक करणार असे सांगितले.जे काढतात दुधाची धार त्यालाच मिळाला पाहिजे मतदानाचा अधिकार असा नारा त्यांनी यावेळी दिला.तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी दुधाच्या सायीवर काळाबाजार करणाऱ्या सफेदपोषांची पोलखोल करीत दूध उत्पादकांच्या जीवावर ही नेतेमंडळी आपल्या तिजोऱ्या कशा भरीत आहेत याबद्दल आकडेवारीसहित माहिती दिली. दुकानातील दुधाचे फॅट किती असते त्याचा दर काय आणि दूध संघाला जे दूध घातले जाते त्याचा फॅट किती,त्याचा दर काय दिला जातो याबद्दल सविस्तर माहिती दिली. या निवडणुकीत दोन्ही आघाड्याकडून जवळपास 500 कोटी रुपयांचा चुराडा होत आहे आणि हा पैसा तुम्हा आम्हा सर्वांच्या घामातुन आणि कष्टातून जे दूध घालतो त्यातूनच काढले जाते. एकूण 58 कोटी लिटर दूध संकलन होते परंतु प्रत्यक्ष मार्केटिंग किती? पनीर आणि इतर उपपदार्थ निर्मितीचा हिशोबच अहवालातुन गायब असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.पशुवैद्यकीय सारख्या सुविधाचा रूटही बंद झाला आहे. हळूहळू सभासदांच्या सुविधा बंद करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय देसाई (दाभेवाडी )म्हणाले की, नवीन दूध संस्था काढून पुढाऱ्यांनी आपल्या खुर्च्या शाबीत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. एका गावाला एकच डेअरी दिली तर तो दूध गोकुळलाच संकलन होत असेल दुसरी संस्था काढण्याची गरजच काय? ज्या संस्था बंद आहेत, ज्या संस्थांचे पाच किंवा दहा लिटर संकलन होते अशा संस्थांचेसूद्धा ठराव झालेले आहेत. असे ठराव रद्द झाले पाहिजेत अशी मागणी केली. दूध उत्पादक शेतकरी हरिश्चंद्र डोंगरे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील राबणाऱ्या मंडळी आणि महिला माता भगिनी यांना मताचा अधिकार मिळावा यासाठी चळवळ तिव्र करावी शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत हा मुद्दा घेऊन गेला पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यासाठी सांगितले पाहिजे अशी मागणी केली.आभार कॉ. संजय घाटगे यांनी मानले
यावेळी कॉ. शांताराम पाटील, युवराज पोवार, नारायण भडांगे, कॉ. संजय तर्डेकर, विष्णू जाधव(सर), आदींनी भाग घेतला.
यावेळी नरेंद्र कुलकर्णी, सखाराम केसरकर शिवाजी इंगळे, शांताराम हरेर, अशोक पाटील, नामदेव फगरे, तुळसाप्पा पोवार यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांना मताचा थेट अधिकार मिळावा यासाठी जाहीर मेळावा संपन्न*
|