बातम्या
बस्तवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीचा स्मार्ट मीटर बसविण्याचा एकमताने ठराव
By nisha patil - 11/9/2026 11:18:08 PM
Share This News:
बस्तवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीचा स्मार्ट मीटर बसविण्याचा एकमताने ठराव
जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत महावितरणसोबत
ग्राहक समाधान शिबिरात शंकांचे निरसन झाल्याने महावितरणला यश
कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर २०२६ : बस्तवाड (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात स्मार्ट मीटर बसविण्याबाबतचा ठराव ग्रामसभा घेऊन एकमताने नुकताच मंजूर केला. गावात महावितरणने ‘ग्राहक समाधान शिबीर’ घेऊन स्मार्ट मीटरचे फायदे, कार्यपद्धती तसेच मीटर रीडिंगबाबत असलेल्या शंकांचे निरसन केल्याने ग्रामस्थांनी गावामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्यात चाफोडी तर्फ तारळे (ता.राधानगरी) नंतर असा ठराव करणारी बस्तवाड (ता.शिरोळ) ही दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे.
बस्तवाड (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव क्रमांक १६ नुसार स्मार्ट मीटर बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला, तत्पूर्वी ग्रामसभेत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद, मीटर रीडिंग सुलभता, देयकमधील पारदर्शकता अशा फायद्यांबाबत ग्रामसभेत झालेल्या सविस्तर चर्चेमुळे ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर झाल्या. यावेळी महावितरणच्या कुरुंदवाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रमोद सोनवणे, कुरुंदवाड ग्रामीण 2 शाखा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सलीम मुजावर यांनी ग्रामस्थांना स्मार्ट मीटरची आवश्यकता, फायदे व गैरसमज याबाबत सविस्तर माहिती दिली.
आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले – जाफर पटेल, ग्रामपंचायत सदस्य
महावितरणने यापूर्वीच मागणीनुसार गावातील पाच ग्राहकांना जुने मीटर व नवे स्मार्ट मीटर सिरिज मध्ये बसवले होते. ग्रामस्थांनी दोन्ही मीटरचे रीडिंग प्रत्यक्ष तपासून आधुनिक तंत्रज्ञानाची स्वीकारले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वापरावर ८५ पैसे सूट मिळणार आहे. गावकर्यांच्या सर्व शंकांचे निरसन महावितरणने केल्याने आम्ही हा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
वीज ग्राहक स्मार्ट मीटरबाबत सकारात्मक – गणपत लटपटे
महावितरणकडून बसवण्यात येणार्या स्मार्ट मीटरबाबत जिल्ह्यातील वीज ग्राहकांत सकारात्मकता वाढत आहे. यामुळेच जिल्ह्यात सुमारे ८० टक्के स्मार्ट मीटर बसवण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वीज ग्राहक स्मार्ट मिटरचे आधुनिक तंत्रज्ञान १०० टक्के स्वीकारून राज्यात अव्वल राहतील याचा विश्वास आहे. याकरिता महावितरण आपली संवाद मोहीम अधिक व्यापकपणे राबवत आहे, असे मत अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी व्यक्त केले आहे.
बस्तवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीचा स्मार्ट मीटर बसविण्याचा एकमताने ठराव
|