बातम्या
वाढती व्यसनाधिनता आणि व्यसनाधिनतेच्या विळख्यात तरुणाई -आजऱ्यात एक मोठे आव्हान
By Administrator - 6/4/2026 11:52:39 AM
Share This News:
वाढती व्यसनाधिनता आणि व्यसनाधिनतेच्या विळख्यात तरुणाई -आजऱ्यात एक मोठे आव्हान
आजरा( हसन तकीलदार):-वाढती व्यसनाधिनता ही आजच्या तरुणाईला आणि समाजाला पोखरून काढणारी एक गंभीर सामाजिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली आहे. आजरा तालुका हा डोंगर कपारीत वसलेला तालुका आहे. तालुक्याच्या सभोवताली डोंगर कपाऱ्यांचा भाग आहे आणि याचाच फायदा घेत काहीजण गांजासारख्या नशिल्या पदार्थांची तस्करी करीत आहेत. किंमत आवाक्यात आणि नशा भरपूर होत असल्यामुळे महाविद्यालयीन, बेरोजगार तरुणासोबत शाळकरी मुलेसुद्धा या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
या नशेखोरीमुळे तरुणाईची घरफोडी पासून खुनापर्यंत मजल गेली आहे. यासाठी योग्य उपाययोजना आखून तरुणाईला या व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढणे काळाची गरज बनली आहे. परवा आजऱ्यात जे प्रकरण घडले त्यामुळे आज दोन्ही कुटुंबे पाण्यात बसली आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून सर्व जाती धर्मातील सजग आणि वैचारिक पातळीच्या लोकांनी एकत्र येऊन एक प्रबोधनात्मक समूह तयार करून युवकांचे समुपदेशन करणे, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते दयानंद भोपळे यांनी आमच्या प्रतिनिधीसमोर मांडले.
व्यसनाधीनतेची कारणे आणि परिणाम यांचा विचार करता मित्रांचा दबाव,वाईट संगत, बेरोजगारी, मानसिक ताणतणाव, ही मुख्य कारणे आहेत. कर्करोग, यकृतरोग, हृदयाचे आजार, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिडेपणा यासारखे दुष्परिणाम होतात तर गुन्हेगारीत वाढ, अपघात, कौटुंबिक हिंसाचार आणि तरुण पिढीचे नुकसान हे सामाजिक परिणाम होताना दिसून येतात.
यासाठी व्यसनमुक्ती हा एकच उपाय आहे. व्यसन हा एक आजार आहे. जो समजून घेऊन रुग्णावर प्रेमाने उपचार किंवा समुपदेशन करणे आवश्यक आहे. केवळ रागाऊन किंवा धमकावून व्यसन सुटत नाही. प्रतिबंधात्मक उपाय करताना पालकांची भूमिका यात महत्वाची आहे. मुलाशी संवाद साधणे, त्यांच्या संगतीवर लक्ष ठेवणे, तो कोठे जातो कोठे बसतो, रात्री घरी किती वाजता येतो यावर लक्ष आणि अंकुश ठेवणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयातून व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि शेवटी कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला पाहिजे.
अमली पदार्थांच्या तस्करीवर आणि विक्रीवर कठोर आणि कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. कायद्याच्या कचाट्यातून गुन्हेगार सुटता कामा नये. जर सुटले तर इतरांच्यावरही याचा विपरीत परिणाम होऊन परिणामी कायद्याची धाक रहात नाही.
या समस्येवर मात करण्यासाठी वैयक्तिक इच्छाशक्ती, कुटुंबाचा पाठिंबा आणि सामाजिक जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. अमली पदार्थाचा शरीरावर, मेंदूवर अंमल चढला की भान रहात नाही. भान हरपून व्यसनाच्या दुष्टचक्रात ते काय करतील याचे भान रहात नाही आणि त्यांच्या हातून विविध गुन्हे घडतात. काही मिनिटाच्या नशेखातर युवक काय करतील याचा नेम नाही यासाठी व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करणे ही समजातील प्रत्येकाचीच जबाबदारी आहे आसे काही सुज्ञ नागरिकांचे मत आहे.
वाढती व्यसनाधिनता आणि व्यसनाधिनतेच्या विळख्यात तरुणाई -आजऱ्यात एक मोठे आव्हान
|