बातम्या
आजरा हायस्कूल येथे 'किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन' कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 3/9/2026 11:28:04 PM
Share This News:
आजरा हायस्कूल येथे 'किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन' कार्यक्रम संपन्न
जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज यांच्या शालेय आंतरवासिता टप्पा क्र. २ अंतर्गत उपक्रम
*आजरा(हसन तकीलदार):-विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज यांच्या शालेय आंतरवासिता टप्पा क्र. २ अंतर्गत आजरा हायस्कूल, आजरा येथे 'किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी यशोदा तांबडे यांनी प्रास्ताविक सादर करताना कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विशद केला.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक सौ. गीतांजली सुतार यांनी उपस्थित मुलींना किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, वैयक्तिक आरोग्य, स्वच्छता, संतुलित आहार तसेच या वयात घ्यावयाची काळजी याविषयी अत्यंत सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन केले. मुलींनी स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहून आत्मविश्वास कसा वाढवावा, यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा.दिव्यांजली माने यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना भावी आयुष्यात स्वावलंबी व सक्षम बनण्याचे आवाहन केले. अशा मार्गदर्शनातून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता आळवेकर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मुबस्सरीन दरवाजकर यांनी मानले. या प्रसंगी आजरा हायस्कूलच्या शिक्षिका, विद्यार्थिनी व जागृती महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी शिक्षिका उपस्थित होत्या.
आजरा हायस्कूल येथे 'किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन' कार्यक्रम संपन्न
|