बातम्या

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 

Guidance on the admission process by D Y Patil School of Architecture


By nisha patil - 7/18/2026 10:19:30 PM
Share This News:



स्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता
 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 

कोल्हापूर आर्कीटेक्चर अर्थात वास्तुकला  हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दिशा देत समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भविष्य घडविणारे करिअर आहे.  हे क्षेत्र केवळ इमारतींची रचना करण्यापुरते मर्यादित नसून सर्जनशीलता, पर्यावरणपूरक विचार, संशोधन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देणारे क्षेत्र असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या बी.आर्क. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित मार्गदर्शन परिसंवादात ते बोलत होते. बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, पालक तसेच वास्तुकला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ. गुप्ता म्हणाले, आजच्या बदलत्या युगात वास्तुविशारदाची भूमिका केवळ इमारतींची रचना करणाऱ्या व्यावसायिकाची राहिलेली नाही. स्मार्ट सिटी, शाश्वत विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक नियोजन या क्षेत्रांमध्ये वास्तुविशारदांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, सर्जनशीलता आणि कौशल्यांचा योग्य वापर करून या क्षेत्रात करिअर घडवावे.

परिसंवादात बी.आर्क. प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, नाटा व जेईई पेपर २ परीक्षा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ मधील महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्ती, आरक्षण, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश क्षमता, सीट वितरण तसेच प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले

यावेळी स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील एआय, बीआयएम, डिजिटल ट्वीन, पॅरामेट्रीक डिझाईन, स्मार्ट सिटीज, ३ डी प्रिंटींग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन, सुसज्ज स्टुडिओ व प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पटकाविलेल्या नासा आर्की. लुईस आय कान ट्रॉफी बद्दल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रोजगाराबरोबरच उद्योजकतेच्या वाढत्या संधींवरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. प्रवेश समन्वयक आर्कि. मंजित जाधव व आर्कि. तिलोत्तमा पाडळे व सर्व प्राध्यापक यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. रवींद्र बेन्नी यांच्यासह  विभागप्रमुख, प्राध्यापक विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.


डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 
Total Views: 9