बातम्या
पाचर्डे येथे आरोग्य शिबिर; शंभर रुग्णांवर उपचार
By nisha patil - 8/14/2026 8:50:26 PM
Share This News:
पाचर्डे येथे आरोग्य शिबिर; शंभर रुग्णांवर उपचार
पाचर्डे, ता. भुदरगड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पाचर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या धनश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना धनश्री पाटील म्हणाल्या, “ग्रामीण भागात सध्या पावसाचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्याच्या विविध तक्रारी जाणवत आहेत. ऊन, वारा आणि पाऊस या तिन्ही वातावरणाचा सातत्याने सामना करावा लागत असल्याने अनेकांचे आरोग्य बिघडत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः वयोवृद्धांनी पाणी उकळून प्यावे.”
देसाई हॉस्पिटल, गारगोटी यांच्या वतीने आयोजित या शिबिराचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा लाभ झाला. शहरातील रुग्णालयात जाण्यासाठी एसटीने दहा किलोमीटरहून अधिक प्रवास करण्यापेक्षा गावातच आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिरात विविध आजारांबाबत तपासण्या करण्यात आल्या. देसाई हॉस्पिटलचा वैद्यकीय व कर्मचारी वर्ग यावेळी कार्यरत होता. रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात सुमारे १०० रुग्णांवर उपचार करण्यात आले.
या प्रसंगी पाचर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा पाटील, उपसरपंच शिवाजी सरनोबत, ग्रामसेवक अनिल ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील, आनंदा सुतार, विमल पाटील, सुधीर पाटील, अशोक कांबळे, दत्ता कांबळे, यशवंत पाटील, विठ्ठल आगम, दशरथ कोळगे, बळीराम पाटील, सुनील पाटील, श्रीपती पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका कमल पाटील, अंगणवाडी मदतनीस शांता पाटील तसेच आशा सेविका वंदना पाटील उपस्थित होत्या. ग्रामपंचायत, अंगणवाडी व आरोग्य विभागातील कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले.
पाचर्डे येथे आरोग्य शिबिर; शंभर रुग्णांवर उपचार
|