बातम्या

स्वर्गीय राजारामबापू देसाई यांना भावपूर्ण आदरांजली; १७५ रक्त दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

Heartfelt tribute to the late Rajarambapu Desai


By nisha patil - 4/8/2026 8:34:05 PM
Share This News:



स्वर्गीय राजारामबापू देसाई यांना भावपूर्ण आदरांजली; १७५ रक्त दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
 

आजरा(हसन तकीलदार):- सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, निस्पृह नेतृत्व आणि आदर्श लोकप्रतिनिधी स्वर्गीय राजारामबापू देसाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात उच्चांकी तब्बल १७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून बापूंना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली. या शिबिरासाठी लायन्स ब्लड बँक, गडहिंग्लज यांचे विशेष सहकार्य लाभले.

बापूंनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी आणि तळागाळातील घटकांच्या हितासाठी सहकाराचे जाळे विणले. तालुका खरेदी-विक्री संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांसारख्या अनेक शिखर संस्थांमध्ये सर्वोच्च पदे भूषवताना त्यांनी सचोटी, पारदर्शकता आणि सुसंस्कृतपणाचा एक अनोखा आदर्श निर्माण केला. त्यांच्या याच निष्कलंक कार्याची आणि पुरोगामी विचारांची धुरा पुढे नेण्याच्या ध्येयाने स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.

या शिबिराचे उद्घाटन  उपपोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या शुभहस्ते पार पडले. याप्रसंगी तालुक्याचे तहसीलदार  समीर माने , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, तालुका खरेदी-विक्री संघाचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी यांनी सर्व उपस्थितांचे यांनी स्वागत केले.
 

सकाळी १० वाजल्यापासूनच परिसरातील नागरिक व विशेषतः तरुणांनी रक्तदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. समाजऋण फेडण्याच्या भावनेने आणि बापूंवरील अढळ प्रेमापोटी तरुणाईचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. लायन्स ब्लड बँक, गडहिंग्लज यांच्या कुशल डॉक्टरांच्या आणि वैद्यकीय तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली शिबिर अत्यंत नियोजनबद्धरीत्या पार पडले. संकलित झालेले रक्त आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपस्थितांचे आणि रक्तदात्यांचे आभार फाउंडेशनचे उपाध्यक्ष युवराज पोवार यांनी मानले. बापूंना अभिप्रेत असणारा सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत अशा समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा भविष्यातही अविरत चालू राहील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
 

रक्तदान शिबीराचे आयोजन करून लायन्स रक्तपेढीस १७५ बॅगा रक्त संकलन करून दिल्याबदल स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनच्या अध्यक्षानी  सहकार्य केलेल्या भागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सर्व तरूण मित्र वर्ग यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करून अनेकांना जीवनदान देणेचे कार्य केले आहे.त्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.
 

'रक्तदान हेच श्रेष्ठदान' समजून मानवतेची ज्योत सतत तेवत ठेवणाऱ्या समाजसेवी व राष्ट्रप्रेमी सामाजीक सहकार्यांचा  सार्थ अभिमान वाटतो. आपणाकडून व आपल्या सर्व सहकार्यांच्याकडू मानवतेची अशीच सेवा घडत राहो ही अपेक्षा व्यक्त केली.


स्वर्गीय राजारामबापू देसाई यांना भावपूर्ण आदरांजली; १७५ रक्त दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Total Views: 188