बातम्या
जिल्हा परिषद गणेशोत्सव बंदीविरोधात हिंदू एकता आंदोलन आक्रमक
By nisha patil - 8/25/2026 1:08:59 PM
Share This News:
जिल्हा परिषद गणेशोत्सव बंदीविरोधात हिंदू एकता आंदोलन आक्रमक
दोन दिवसांत निर्णय मागे न घेतल्यास सरकारी कार्यालयांमध्ये महाआरतीचे आयोजन; ‘मोरया आंदोलन’ छेडणार
कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूरच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेला गणेशोत्सव यंदा बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात हिंदू एकता आंदोलनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि जनभावनेचा अविभाज्य भाग असून, राज्य शासनाने त्याला ‘राज्य उत्सव’ म्हणून मान्यता दिलेली असताना जिल्हा परिषद प्रशासनाने गणेशोत्सवाला परवानगी नाकारणे ही अत्यंत गंभीर व खेदजनक बाब असल्याचे आंदोलनाने म्हटले आहे.
काँग्रेसच्या काळात सुरू झालेला जिल्हा परिषद कार्यालयातील गणेशोत्सव हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेत असताना बंद होणे ही शोकांतिका आहे, अशी टीका हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दिपक देसाई यांनी केली.
गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्या मानसिकतेविरोधात कोल्हापुरातील हिंदू समाज शांत बसणार नाही. हिंदू धर्म, सण-उत्सव आणि परंपरांना विरोध करणाऱ्यांना कायदेशीर व लोकशाही मार्गाने जाब विचारल्याशिवाय हिंदू एकता आंदोलन स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही देसाई यांनी दिला.
राजकीय नेत्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा
जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयामध्ये सरकारमधील स्थानिक तसेच संबंधित राजकीय नेत्यांनी तातडीने लक्ष घालावे. प्रशासनाने गणेशोत्सवाबाबत घेतलेला निर्णय त्वरित मागे घेऊन जिल्हा परिषद कार्यालयात परंपरेप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाने केली आहे.
“गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली परंपरा अचानक थांबविण्याचे कारण काय? गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून मान्य असताना सरकारी कार्यालयातच त्याला विरोध का?” असा सवालही आंदोलनाने उपस्थित केला आहे.
दोन दिवसांची मुदत; ‘मोरया आंदोलन’चा इशारा
याबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊन गणेशोत्सवाला परवानगी देण्यात आली नाही, तर हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन गणपतीची महाआरती आयोजित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, या आंदोलनाला ‘मोरया आंदोलन’ असे नाव देण्यात आले आहे.
या आंदोलनात कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, गणेश मंडळे, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाने केले आहे.
“गणेशोत्सव ही आमची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा आहे. परंपरा खंडित करण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. प्रशासनाने तातडीने निर्णय बदलावा; अन्यथा लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने ‘मोरया आंदोलन’ अधिक तीव्र करण्यात येईल,” असे हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दिपक देसाई यांनी सांगितले.
जिल्हा परिषद गणेशोत्सव बंदीविरोधात हिंदू एकता आंदोलन आक्रमक
|