बातम्या
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळ्यात ४१ आरोपींची ओळख परेड
By nisha patil - 11/9/2026 11:14:05 PM
Share This News:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळ्यात ४१ आरोपींची ओळख परेड
अवैध धंदे व गुन्हेगारी कारवाया बंद करण्याची सक्त ताकीद; पुन्हा गुन्हा केल्यास हद्दपारीचा इशारा
पन्हाळा प्रतिनिधी : शहाबाज मुजावर सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने पन्हाळा पोलीस ठाण्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. या परेडसाठी एकूण ४१ आरोपी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पन्हाळा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
यावेळी आरोपींना अवैध धंदे तसेच कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली. यापुढे पुन्हा गुन्हेगारी कृत्य केल्यास माननीय अपर पोलीस अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक हद्दपारीची कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांकडून बाँडची रक्कम दंड म्हणून जमा करून घेण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी दिला.
“सुधारण्यासाठी तुम्हाला संधी देत आहे. या संधीचा योग्य उपयोग करून गुन्हेगारीपासून दूर राहा,” असे आवाहनही त्यांनी उपस्थित आरोपींना केले. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस निलेश पडवळ, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळ्यात ४१ आरोपींची ओळख परेड
|