बातम्या

६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – मनसेचे डॉ. युवराज येडूरे यांचा इशारा

Immediately arrest the accused involved in the alleged financial


By nisha patil - 3/8/2026 1:15:55 PM
Share This News:



६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – मनसेचे डॉ. युवराज येडूरे यांचा इशारा

संत बाळूमामा देवस्थानातील कथित ६० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तेरा दिवस उलटले, तरी एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून तपासाला गती द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे डॉ. युवराज येडूरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
 

डॉ. येडूरे यांनी सांगितले की, देवस्थानच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या बकरी विक्री व्यवहारात सुमारे ४१ कोटी रुपये आणि जागा खरेदी-विक्री व्यवहारात सुमारे १९ कोटी रुपये, असा एकूण ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडूतील लाखो भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंजाराव खडके, देवस्थानाचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी, तत्कालीन विश्वस्त मंडळातील काही सदस्य, व्यापारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात १९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा नोंदवूनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने तपासाच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

एवढ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात विलंब झाल्यास पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित आरोपींना तातडीने अटक करून निष्पक्ष व वेगवान तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 

याशिवाय, देवस्थानाचे लेखनिक अरविंद गणेश स्मार्त यांचे कथित अपहरण करून त्यांना धमकावत देवस्थानाचे इतिवृत्त बदलण्यास भाग पाडल्याप्रकरणी कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबुराव होडगे, पदसिद्ध विश्वस्त यांच्याविरोधात २७ ऑक्टोबर रोजी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या अपहरण प्रकरणाचा आणि ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा परस्पर संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 

देवस्थानातील निर्णय प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांवर प्रभाव टाकण्यासाठी हा प्रकार घडविण्यात आला होता का, याचीही सखोल चौकशी व्हावी. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. आरोपींवर अटकेची कारवाई नेमकी कधी होणार, कथित आर्थिक गैरव्यवहाराचे संपूर्ण सत्य कधी समोर येणार आणि अपहरण प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का, असा सवाल डॉ. युवराज येडूरे यांनी उपस्थित केला.
तसेच, भाविकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा यासाठी या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळेत तपास पूर्ण करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

तसेच, योग्य कालावधीत आवश्यक कायदेशीर कारवाई न झाल्यास मा राजसाहेब ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आदेशानुसार मनसे संर्पक अध्यक्ष यशवंत किल्लेदार व नंदकुमार चिल्ले तसेच जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखालील आणि भाविकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आवश्यक असल्यास रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
 

यावेळी मनसे नेता डॅा युवराज येडूरे अध्यक्ष महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन, मनसे पदाधिकारी राहुल पाटील, राहुल कुंभार, विश्वजीत पाटील, प्रकाश पाटील, दिपक जरग सुशांत पाटील, प्रविण मनुगडे आदी उपस्थित होते.
 

आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही. दोषी कोण आहे हे न्यायालय आणि तपास यंत्रणा ठरवतील. मात्र, कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असली पाहिजे आणि तपास वेगाने झाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.


६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – मनसेचे डॉ. युवराज येडूरे यांचा इशारा
Total Views: 22