शैक्षणिक
बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले उपक्रम राबवा - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
By nisha patil - 7/5/2026 12:40:43 PM
Share This News:
बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले उपक्रम राबवा - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
येणारे वर्ष हे बालभारतीच्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. बालभारतीच्या नियामक मंडळाची 259 वी सभा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या पार पडली. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, एससीईआरटीचे संचालक डॉ.हेमंत वसेकर, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, उपसचिव तुषार महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला जातो. याप्रसंगी बालभारतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. या माध्यमातून नागरिकांना बालभारती वर्षानुवर्षे करीत असलेल्या सकारात्मक कामांची माहिती देखील होईल. बालभारतीच्या पुस्तकांसाठीचा कागद साठवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जागेची आवश्यकता असते. अशी जागा खरेदी करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन इतर शासकीय विभागांची जागा उपलब्ध असल्यास तिचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करावा. शालेय शिक्षण विभागाच्या विविध शाखांची राज्यात कुठे आणि किती जागा आहे याची एकत्रित माहिती तयार करुन त्याचे सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच या जागांचा विकास करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात याव्यात,असेही मंत्री भुसे म्हणाले.
बालभारतीसाठी दर्जेदार लेखन करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या - डॉ.पंकज भोयर
राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी बालभारतीसाठी दर्जेदार लेखन करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी त्यांना पारितोषिक देणे, त्यांचे साहित्य किशोर मासिकामध्ये प्रकाशित करणे यावर भर देण्याची सूचना केली. राज्यात पाच ठिकाणी शासनाच्या विद्यानिकेतन या शाळा आहेत, या शाळांमधून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात यावीत अशी सूचना करुन बालभारतीमार्फत विद्यानिकेतनचा विकास करण्यासाठी अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्यातील शाळांबाबत समाजमाध्यमांमधून लेखन करणाऱ्या, माहिती देणाऱ्या इन्फ्लुएन्सरना शाळांमधून राबविल्या जाणाऱ्या चांगल्या उपक्रमांची माहिती द्या, असेही त्यांनी सांगितले.
बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी यावेळी बालभारतीच्या कामांची तसेच राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले उपक्रम राबवा - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
|