बातम्या

नवभारताच्या निर्मितीत - राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य 

In the creation of a new India


By nisha patil - 4/30/2026 1:11:29 PM
Share This News:



नवभारताच्या निर्मितीत - राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य 

 

भारतीय संतपरंपरा ही केवळ अध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचीही प्रभावी परंपरा मानली जाते. या परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जयंती दिन. राष्ट्रसंतांच्या सूचनेवरुन त्यांचा जन्मदिवस ग्रामजयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे 30 एप्रिल 1909 रोजी झाला. नवभारताच्या निर्मितीत ज्या संतांनी एक संघ, भारत समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रयत्न केले त्याचे अग्रणी आणि या कल्पनेचे नेतृत्व साकारणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजच्या काळातही राष्ट्रसंत म्हणून वंदनीय ठरतात. संत परंपरेतील इतर संतांप्रमाणेच त्यांनी भजन, कीर्तन, प्रवचन यांचा उपयोग करुन जनजागृती केली; मात्र त्यांच्या कार्याचा व्याप केवळ धार्मिक मर्यादांमध्ये न राहता राष्ट्रनिर्मितीपर्यंत पोहोचला. त्यामुळेच त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी लाभली.

नांदोत सुखे गरीब-अमीर एकमतानी…

दे वरची असा दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे… 

 

नागपूर विद्यापीठाने त्यांच्या गीताला विद्यापीठ गीत म्हणून स्वीकारले आहे. विद्यापीठाच्या गीतात उमटणारे राष्ट्रसंतांचे भजन ऐकले की आजही मन भरुन येते. या ओळी केवळ भजन नाहीत, तर भारताच्या अस्तित्वाचा मूलमंत्र आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बंधुता टिकली तरच राष्ट्र टिकते’ हा विचार ठामपणे मांडला. आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भजन, कीर्तन आणि ग्रामविकासाच्या कार्यातून सर्व धर्म, पंथ आणि समाजघटकांना एकत्र आणण्याचा लोकोत्तर प्रयत्न केला. त्यांनी 1943 साली अमरावती-नागपूर महामार्गावरील ‘मोझरी’ येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. हे स्थळ सर्वधर्मीय समन्वयाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. सब के लिए खुला है मंदिर यह हमारा या ब्रीदाखाली येथील कामकाज चालते. येथील प्रार्थना मंदिरात सर्व धर्माच्या संतांना समान स्थान देण्यात आले आहे.

 


नवभारताच्या निर्मितीत - राष्ट्रसंतांचे लोकोत्तर कार्य 
Total Views: 4