बातम्या

शहाजी महाविद्यालयात भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न

Inauguration ceremony of the Language Board


By nisha patil - 7/24/2026 12:03:26 PM
Share This News:



बहुभाषिकता : आजच्या काळाची गरज : प्रा. हेमंत पाटील

शहाजी महाविद्यालयात भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर :शहाजी महाविद्यालयात  मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील इंग्रजी विषयाचे प्रा. हेमंत पाटील यांनी आजच्या जागतिक युगात प्रत्येक व्यक्तीने अनेक भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे.

चार किंवा त्यापेक्षा अधिक भाषा अवगत असलेल्या व्यक्तीला बहुभाषिक असे म्हणतात. इंग्रजी ही आज संपूर्ण जगात संपर्काची आणि ज्ञानाची महत्त्वाची भाषा बनली आहे. विविध भाषा शिकल्यामुळे व्यक्तीची विचारशक्ती, आकलन क्षमता आणि मेंदूची ज्ञान संपादन करण्याची क्षमता वाढते तसेच विविध भाषांचे ज्ञान, रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवते. भाषा कोणतीही असो भावना मात्र सर्व भाषांमध्ये समान असतात म्हणून विविध भाषांचा आदर करणे, त्या शिकणे आणि त्यांचा योग्य वापर करणे ही काळाची गरज असल्याची त्यांनी सांगितले.
     

अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. शानेदिवाण यांनी बहुभाषिकतेचे महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे विशद केले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुन्शी प्रेमचंद आणि आचार्य विनोबा भावे यासारख्या महान व्यक्तींना एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान होते. विविध भाषावर प्रभुत्व असल्यामुळे त्यांना विविध विषयाचे ज्ञान मिळाले, वेगवेगळ्या संस्कृती समजल्या आणि त्यांनी समाजाला बहुमोल विचार दिले.
 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहुभाषिकता : व्यक्तिमत्व विकासाची गुरुकुल्ली या विषयावर भित्तिपत्रक तसेच मराठीचे 'माय मराठी अभ्यास मंडळ' इंग्रजीचे ELLA अभ्यास मंडळ व हिंदीचे 'हिंदी अध्ययन मंडल' आदी भाषाविभागांच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
   श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. 

 

मराठी विभागप्रमुख डॉ. डी. के. वळवी यांनी स्वागत केले तर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एन. एस. जाधव यांनी आभार मानले. पाहुण्यांचा परिचय डॉ.एस. एस. पाटील यांनी केला तर सूत्रसंचालन डॉ.पल्लवी कोडक डॉ.सारिका कांबळे प्रा. स्नेहल भोसले यांनी केले. 
 

यावेळी आय. क्यू. ए.सी.समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर, डॉ. ए. बी. बलुगडे, परीक्षा विभागप्रमुख डॉ. डॉ. के. एम. देसाई, सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


शहाजी महाविद्यालयात भाषा अभ्यास मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न
Total Views: 32