बातम्या

सवतकडा धबधब्यावर आधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण; साहसी पर्यटनाला मिळणार नवे बळ

Inauguration of modern tourism facilities at Savatkada Waterfall


By nisha patil - 7/20/2026 11:52:17 AM
Share This News:



सवतकडा धबधब्यावर आधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण; साहसी पर्यटनाला मिळणार नवे बळ

कोल्हापूर वन विभागांतर्गत गारगोटी वनपरिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी 'वनपर्यटन राज्य योजना' आणि 'स्टेट इको-टुरिझम' निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी, सवतकडा परिसरात निसर्ग पर्यटनाला साहसी पर्यटनाची जोड देण्यात आल्याने येथील पर्यटनाला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पर्यटकांसाठी झिप लाईन, विविध एडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रेन्स पार्क, सोव्हेनिअर शॉप तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने हा परिसर अधिक आकर्षक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वनविभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सोव्हेनिअर शॉपचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.

वनविभागामार्फत पर्यटकांसाठी सुरक्षित व दर्जेदार झिप लाईन, लहान मुलांसाठी चिल्ड्रेन्स पार्क तसेच विविध साहसी खेळ विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे सात धबधब्यांच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेतानाच संपूर्ण कुटुंबासह दिवसभर पर्यटनाचा आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.

या कार्यक्रमास मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, पोलीस उपअधीक्षक विक्रम पाटील, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, माजी पंचायत समिती सभापती बाबा नांदेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप वरंडेकर, गारगोटी वनपरिक्षेत्र अधिकारी ए. जी. तायनाक, सहाय्यक वनसंरक्षक वि. र. काळे, कडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. चौगुले यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कागल प्रतिनिधी अजित बोडके


सवतकडा धबधब्यावर आधुनिक पर्यटन सुविधांचे लोकार्पण; साहसी पर्यटनाला मिळणार नवे बळ
Total Views: 17