बातम्या
केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण
By nisha patil - 3/8/2026 9:35:31 PM
Share This News:
केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण
महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून तयारीची पाहणी
कोल्हापूर, ता. ३ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सौ. रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सोमवारी संबंधित स्थळांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला.
या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, दुधाळी येथील ६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यांतर्गत बहुमजली पार्किंग, गोकुळ हॉटेल परिसरातील मल्टीलेव्हल कार पार्किंग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील आधुनिक आर्ट गॅलरी व कलादालन तसेच रंकाळा तलावातील संगीत कारंज्याचे लोकार्पण होणार आहे. याचवेळी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत भूमिपूजनही करण्यात येणार आहे.
महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्वप्रथम नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावरील आधुनिक आर्ट गॅलरी व कलादालनाची पाहणी केली. उर्वरित अंतिम कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करून नाट्यगृहातील कामे पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. बाह्य परिसरातील पार्किंगची कामे तातडीने दोन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आले. यानंतर रंकाळा तलावातील संगीत कारंज्याच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. तसेच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचीही पाहणी करण्यात आली. लोकार्पण सोहळा नियोजनबद्ध आणि दिमाखात पार पडावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम पूर्ण करण्याच्या सूचना महापौर आणि आयुक्तांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, गटनेते आदिल फरास, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, मिलिंद जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, सहा.अभियंता नारायण पुजारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा.अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांडरे, व्यवस्थापक समीर महाब्री, कनिष्ठ अभियंता अमित दळवी आदी उपस्थित होते.
केशवराव भोसले नाट्यगृहासह विविध विकासकामांचे ९ ऑगस्टला लोकार्पण
|