बातम्या
*येळणेना वाचवणाऱ्या कुंभार यांचीही चौकशी करा-ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची
By nisha patil - 8/20/2026 12:58:52 PM
Share This News:
*येळणेना वाचवणाऱ्या कुंभार यांचीही चौकशी करा-ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची
*हाजगोळी खुर्द ता. आजरा येथे रात्री ग्रामपंचायतीसमोर हाय व्होल्टेज ड्रामा
*आजरा(हसन तकीलदार):-हाजगोळी खुर्द ता. आजरा येथील ग्रामसेवक येळणे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर पंचायत समितीचे अधिकारी कुंभार यांनी काल दि. 19/8/2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ग्रामपंचायत ऑफिस सील केले होते. परंतु त्याच दिवशी रात्री 8:00 वाजता हाजगोळी येथे येऊन कुंभार यांनी ग्रामपंचायत ऑफिस उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. रोहन जाधव व ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारत विरोध केला.
यावेळी डॉ. रोहन जाधव म्हणाले की, एकदा सील केलेले ग्रामपंचायत ऑफिस कोणतेही लेखी आदेश नसताना या अधिकाऱ्याने ऑफिस उघडण्याचा प्रयत्न का केला? असं या ग्रामपंचायतीमध्ये आहे तरी काय? जे एव्हढ्या रात्री येऊन हे ग्रामपंचायत ऑफिस उघडण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामसेवक येळणे यांना हे जर वाचवण्याचा प्रयत्न करीत असतील तर कुंभार यांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. यात आणखीन कोणकोण आहेत याचाही छडा लावायचा असेल तर आजऱ्यातील ही टीम चौकशी न करता बाहेरील अधिकाऱ्यांच्या टीमने चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रात्री उशिरापर्यंत हे नाट्य सुरु होते. तेव्हा जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई ही घटनास्थळी पोहचले. त्यांनीही संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. ते म्हणाले की, लोकांना कल्पना द्यायच्या अगोदर तुम्ही एवढ्या रात्री आलाच कसे? एकदा ऑफिस सील केल्यानंतर त्याचा रीतसर पंचनामा होतो आणि किल्ली कोणाकडे ठेवायची याची नोंद होते.
मग तुम्ही अचानक परस्पर येऊन ऑफिस उघडायला आलाच कसे?असा सवाल उपस्थित केला. यावेळी बाळासाहेब तांबेकर, सुधाकर प्रभू, राजाराम कांबळे, माजी सरपंच रवींद्र जाधव यांनीही आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांसोबत अधिकाऱ्याच्या गाडीसमोर ठिय्या मांडला.
*येळणेना वाचवणाऱ्या कुंभार यांचीही चौकशी करा-ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची
|