बातम्या
सवतकडा पर्यटन प्रकल्पातील निधी व परवानग्यांची चौकशी करा
By nisha patil - 12/8/2026 3:31:43 PM
Share This News:
सवतकडा पर्यटन प्रकल्पातील निधी व परवानग्यांची चौकशी करा
₹7 ते ₹8 कोटींच्या निधीबाबत पारदर्शकता आवश्यक; RTI व चौकशी अर्ज दाखल
भुदरगड | प्रतिनिधी भुदरगड तालुक्यातील नितवडे–खेडगे परिसरातील प्रसिद्ध सवतकडा धबधबा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या विविध कामांबाबत निधीचा वापर, प्रशासकीय मंजुरी, वनविषयक परवानग्या, निविदा प्रक्रिया आणि पर्यटकांच्या सुरक्षेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. युवराज येडूरे यांनी केली आहे.
सदर पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासनाच्या विविध विभागांकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक माध्यमांमधून समोर आली आहे. उपलब्ध वृत्तांनुसार या परिसरातील पर्यटन विकासासाठी सुमारे ₹7 कोटींचा आराखडा असून त्यापैकी सुमारे ₹3.44 कोटींची कामे पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर वनपर्यटन व इको-टुरिझम अंतर्गत आणखी काही सुविधा उभारण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकल्पासाठी आजपर्यंत नेमका किती निधी मंजूर झाला, किती वितरित झाला आणि प्रत्यक्ष किती खर्च झाला, याबाबत अधिकृत कागदपत्रांच्या आधारे जनतेसमोर स्पष्ट माहिती येणे आवश्यक असल्याचे डॉ. युवराज येडूरे यांनी म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉ. येडूरे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत RTI अर्ज दाखल करून वन विभाग व पर्यटन विभागाकडून प्रकल्पाचा DPR, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निधी वितरण आदेश, कामनिहाय खर्च, निविदा कागदपत्रे, ठेकेदार, Work Order, Measurement Book, बिलांची माहिती तसेच काम पूर्णत्व प्रमाणपत्र मागितले आहे.
सदर परिसर वनक्षेत्राशी संबंधित असल्याने वन विभागाची NOC, आवश्यक Forest Clearance, पर्यावरणविषयक परवानग्या आणि बांधकामासाठी आवश्यक असलेल्या वैधानिक मंजुरी घेण्यात आल्या आहेत का, याचीही माहिती मागविण्यात आली आहे.
तसेच सवतकडा परिसरात पायऱ्या, पूल/साकव, सुरक्षा कठडे, स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, दिशादर्शक फलक तसेच झिपलाइन व Adventure Sports सारख्या सुविधा उभारण्यात आल्याने या सुविधांसाठी आवश्यक असलेली सुरक्षा प्रमाणपत्रे, Safety Audit आणि इतर वैधानिक परवानग्यांचीही पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सवतकडा पर्यटन विकास प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी स्वतंत्र लेखी मागणी डॉ. युवराज येडूरे यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे केली आहे. प्रकल्पाचा एकूण निधी, प्रत्यक्ष खर्च, निविदा प्रक्रिया, ठेकेदार, कामांची गुणवत्ता, वन व पर्यावरणविषयक परवानग्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“हा विषय कोणत्याही व्यक्तीविरोधातील आरोपांचा नसून सार्वजनिक निधीचा पारदर्शक व नियमानुसार वापर झाला आहे का, तसेच पर्यटनस्थळावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत का, हे जनतेसमोर स्पष्ट व्हावे, यासाठी आम्ही अधिकृत कागदपत्रे मागवत आहोत,” असे डॉ. युवराज येडूरे यांनी स्पष्ट केले.
महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉ. युवराज येडूरे यांनी पुढे सांगितले की, सवतकडा हा भुदरगड तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा नैसर्गिक ठेवा आहे. त्यामुळे विकासकामांना विरोध नसून विकासासोबत पर्यावरण संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक निधीमध्ये पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक आहे.
आता RTI मधून मिळणारी अधिकृत कागदपत्रे आणि प्रशासनाकडून होणारी चौकशी यामधून सवतकडा पर्यटन प्रकल्पासाठी नेमका किती निधी खर्च झाला आणि सर्व आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याचे स्पष्ट चित्र जनतेसमोर येण्याची अपेक्षा आहे.
सवतकडा पर्यटन प्रकल्पातील निधी व परवानग्यांची चौकशी करा
|