बातम्या

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा - आप ची मागणी 

Inspect hotels restaurants and sweet shops


By nisha patil - 8/13/2026 7:39:54 PM
Share This News:



हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा - आप ची मागणी 

संपूर्ण राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत धडक मोहीम राबवली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर धडक छापे मारून मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
 

परंतु, जिल्ह्यात अद्याप अशी कोणतीही ठोस कारवाई दिसून आलेली नाही. कोल्हापूर हे पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे येथे रोज हजारो नागरिक आणि पर्यटक हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्सना भेट देतात. अशा परिस्थितीत येथील अन्न सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

त्यामुळे, जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे केली. या संबंधीचे निवेदन सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले. 

धडक मोहिमेची सुरुवा कोल्हापूरातील गर्दीच्या रेस्टॉरंट्स तसेच हॉटेल्सपासून करण्यात यावी. हॉटेल्सच्या किचनमधील स्वच्छता, वापरले जाणारे तेल, अन्नपदार्थांचा दर्जा आणि साठवणूक पद्धतीची कसून तपासणी व्हावी. मिठाई दुकाने आणि रेस्टॉरंट मध्ये वापरले जाणारे खवा, पनीर, चीज, दही, तूप, लोणी या पदार्थांची शुद्धता व गुणवत्ता पडताळणी व्हावी. प्रत्येक रेस्टॉरंटकडे वैध परवाना आहे की नाही आणि त्यांनी नियमांचे पालन केले आहे का, हे बघण्यात यावे. 

जे रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स चालकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल, त्यांचे परवाने तात्काळ रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात युद्धपातळीवर मोहीम सुरू करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी आप चे शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, समीर लतीफ, विजय हेगडे आदी उपस्थित होते.


हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा - आप ची मागणी 
Total Views: 10