बातम्या
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मुफज्जल लकडावाला यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार
By nisha patil - 1/8/2026 12:44:55 PM
Share This News:
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मुफज्जल लकडावाला यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार
सीपीआरमध्ये २५ जणांवर होणार अति अवघड व गुंतागुंतीच्या मोफत शस्त्रक्रिया
कोल्हापूर, दि. ३१: जनसेवा सप्ताह अंतर्गत गेले दोन दिवस कोल्हापुरात मोफत रुग्णसेवा करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लॅप्रोस्कोपिक व बेरियट्रिक तज्ज्ञ डॉ. मुफज्जल लकडावाला यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये अति अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या. या निष्स्पृह व मोफत सेवाभावी कार्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचा सत्कार केला.
याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची जयंती व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफयांच्या आवाहनानुसार डाॅ. मुफज्जल लकडावाला यांनी ही मोफत सेवा केली.
डॉ. मुफज्जल लकडावाला हे गेले दोन दिवस कोल्हापुरात थांबून ही सेवा देत आहेत. यामध्ये ते एकूण २५ शस्त्रक्रिया करणार आहेत, ज्यामध्ये दुर्बिणीतून हर्निया, अपेंडिक्स,लठ्ठपणावर नियंत्रण अशा शस्त्रक्रियांचा समावेश आहे. शुक्रवार ३१ रोजी डॉ. लकडावाला यांनी १५ जणांवर शस्त्रक्रिया केल्या. शनिवार १ रोजी ते उर्वरित १० शस्त्रक्रिया करणार आहेत. आज त्यांनी अत्यंत गुंतागुंतीची अशी एक लठ्ठपणावरील शस्त्रक्रियाही केली.
मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याशी बोलताना डॉ. लकडावाला म्हणाले, कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची राजधानी आहे. कोल्हापूरमध्ये येऊन अशी सेवाभावी पद्धतीने रुग्णांना सेवा देताना मला विशेष आनंद होतो. येत्या दोन ते अडीच महिन्यांनंतर मी पुन्हा येऊन या पद्धतीने शस्त्रक्रिया करणार आहे.
डॉ. लकडावाला यांना समन्वयक म्हणून डॉ. इब्राहिम अन्सारी व डॉ. चैतन्य टिंगणे यांनी सहकार्य केले
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मुफज्जल लकडावाला यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार
|