बातम्या

कागलमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा 

Kagal melava


By nisha patil - 10/4/2026 6:28:31 PM
Share This News:



सखोल मतदार यादी निरीक्षणामध्ये जागरूक राहून गांभीर्याने सहभाग नोंदवा.....

मंत्री हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन       

कागलमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा 

 कागल, दि. १०: मतदान याद्यांची सखोल निरीक्षण म्हणजेच एस. आय. आर. मोहीम सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जागरूकपणे व गांभीर्याने घ्यावे. एकही पात्र मतदार यादीबाहेर राहणार नाही यासाठी गावनिहाय, प्रभागनिहाय बैठका घेऊन काटेकोर नियोजन करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

या मोहिमेत २०२४ च्या मतदार यादीत ज्यांचे नाव आहे, त्यांचे नाव २००२ च्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. २००२ च्या याद्यांमध्ये नावे नसल्यास त्याबाबतचे योग्य ते पुरावे गोळा करा. तसेच; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करावा. याबाबत काही शंका आणि अडचणी असल्यास तात्काळ संपर्क साधा, असेही ते म्हणाले. 

         

कागलमध्ये मतदार यादी सखोल पुनरीक्षण, पदवीधर मतदार नोंदणी, गोकुळ दूध संघ, पी. एम. सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा पानंद/ शेत रस्ते योजना याबाबत आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. 

            

भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूर्यघर योजनेचा लाभ घराघरात पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, सबंध जिल्ह्याचे घरगुती विजबिल शून्यावर आणण्याचा माझा संकल्प आहे. या योजनेसाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे.

         

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघातील सर्वच पानंद आणि शेत रस्ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री बळीराजा पानंद/शेत रस्ते करण्यामध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ सबंध राज्यात अग्रेसर ठरेल. 

          

पी. एम. सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबवून कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती वीजबिले शून्यावर आणणे हेच माझे स्वप्न आणि हाच माझा ध्यास आहे. त्यासाठी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून अल्प व्याजदरात अर्थसहाय्यही करणार आहोत.

 गोकुळ दूध संघाबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सुरू आहे. त्यामुळे, या विषयावर बोलल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. त्यामुळे या विषयावर आठ-दहा दिवसांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊनच स्पष्ट बोलू, असेही ते म्हणाले.

 जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, एसआयआर प्रक्रिया सुरू असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. एकदा मतदान कमी झाले तर पुन्हा वाढवणे कठीण होते. पदवीधर मतदार नोंदणी अद्याप सुरू असल्याने गावागावात कार्यकर्त्यांनी पदवीधरांची नोंदणी करून घ्यावी. तसेच मंत्री मुश्रीफ यांनी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करून जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा पुन्हा निर्माण केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 एकाच कवळ्यात........!

राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना  मुश्रीफ म्हणाले, परवाच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांना मी शुभेच्छाही दिलेल्या होत्या. अनेक चॅनेल आणि मुलाखतींमध्ये त्यांनी माझे दिलदारपणाने कौतुकही केलेले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दोघांनी एकमेकांना कवळ्यात घेतल्यानंतरसुद्धा त्यांचा मला फोन आला होता. मी त्यांना सांगणार आहे, मुख्यमंत्र्याबरोबर माझा, त्यांचा आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे असा चौघांचा एका कवळ्यात घेतलेला फोटो काढूया. माजी खासदार संजय मंडलिकही आले तरी त्यांनाही सोबत घेऊन या तालुक्याचा सर्वांगसुंदर विकास करूया.

 यावेळी विवेक जकाते यांनी एस. आर. आय. बाबत मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोत, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शोभाकाकी फराकटे, सौ. सुवर्णा कांबळे, सौ. शैलजा पाटील, शिरीष देसाई, आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे, कागल पंचायत समितीच्या उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा जाधव, दीपक सोनार, सौ. रुपाली आंगज, सौ सुनीता देसाई, विकास चोथे यांचे सत्कार झाले. कागल तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी तेजस चौगुले व उपाध्यक्षपदी गौरव बोभाटे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.                

 गोडसाखरचे संचालक भरमु जाधव, पाटील सौ. मंगल आरबोळे, अरुण गवळी, तनवडीचे सरपंच बसवराज आरबोळे इंचनाळचे सरपंच उत्तम कांबळे यांच्यासह उदय देसाई, विलास देशपांडे, सचिन पाटील, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

 यावेळी वसंतराव धुरे, गोकुळचे माजी चेअरमन रणजीत पाटील, सतीश पाटील, राजेखान जमादार, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष तुरबतमठ, कागलच्या नगराध्यक्षा सविता माने, जि. प. सदस्या शोभाताई फराकटे, कागल पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजीत पाटील, चंद्रकांत गवळी, शशिकांत खोत, प्रकाश गाडेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक भैय्या माने यांनी केले.


कागलमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा 
Total Views: 17