राजकीय
अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा ; जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन
By nisha patil - 5/15/2026 12:22:39 PM
Share This News:
अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा ; जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : जागतिक हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या ‘अल निनो’च्या संभाव्य संकटामुळे मान्सूनवर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. यंदा जूनमध्ये मुसळधार पाऊस, तर जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.
पाणी नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मान्सूनमधील अनिश्चितता पाहता उपलब्ध पाणीसाठा केवळ जूनपर्यंत मर्यादित न ठेवता तो ऑगस्टअखेरपर्यंत पुरेल, या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पाण्याचा काटकसरीने वापर करणे अनिवार्य आहे. जलसंपदा आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील धरणसाठा आणि भूजल पातळीचा दररोज आढावा घ्यावा. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी पुरवठा योजनांचे तातडीने ऑडिट करून गळती रोखावी.
पूर आणि भूस्खलन आपत्तीकडे विशेष लक्ष
जुलै-ऑगस्टमध्ये दुष्काळी स्थिती असली तरी जूनमधील संभाव्य अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या पूरस्थिती आणि भूस्खलनासारख्या आपत्तींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपत्तीची वाट न पाहता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या नैसर्गिक घटना घडू शकतात, हे गृहीत धरून यंत्रणांनी सतर्क राहावे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पाणी उपसा आणि वापराचे सुसूत्रीकरण करण्याचे धोरण अवलंबण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे नियोजन
पावसातील प्रदीर्घ खंड लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तातडीने 'अॅडव्हायझरी' प्रसिद्ध करावी. शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची शिफारस करावी. त्याचप्रमाणे, पशू संवर्धन विभागाने जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही याची खात्री करावी. चारा डेपोचे आगाऊ नियोजन करून पशुधनासाठी चारा आणि पाण्याचे स्त्रोत सुरक्षित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आरोग्य यंत्रणा आणि जनजागृती
हवामानातील बदलांमुळे संभाव्य उष्णतेची लाट याचे परिणाम रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे. ग्रामीण भागात ओआरएस पाकिटे आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा. उष्णतेपासून बचावासाठी 'काय करावे आणि काय करू नये' याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क करावे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
जिल्हा प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा अपव्यय टाळावा. याबाबत नवीन हवामान अंदाज मे महिन्याच्या अखेर पर्यंत उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्रत्येक घटकाचे वेळोवेळी मूल्यांकन करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. या बैठकीला जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे संबंधित विभाग प्रमूख ऑनलाइन उपस्थित होते.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा ; जिल्हाधिकाऱ्यांचे विभागनिहाय सविस्तर आदेश नागरिकांनाही पाणी बचतीचे आवाहन
|