बातम्या

कोल्हापूर महानगरपालिकेचा शिष्यवृत्ती पॅटर्न भारी

Kolhapur Municipal Corporation12


By nisha patil - 11/8/2026 11:19:42 PM
Share This News:



कोल्हापूर महानगरपालिकेचा शिष्यवृत्ती पॅटर्न भारी

इयत्ता चौथी राज्य गुणवत्ता यादीत 18 तर जिल्हा गुणवत्ता यादीत 74 विद्यार्थी चमकले

इयत्ता सातवी राज्य गुणवत्ता यादीत 4 जिल्हा गुणवत्ता यादी 31 विद्यार्थी

 
कोल्हापूर ता.11 : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महापालिकेच्या शाळांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी ) मध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात या दोन्ही परीक्षांमध्ये महानगरपालिका शाळेतील 22 मुले राज्य गुणवत्ता यादीत तर 105 मुले जिल्हा गुणवत्ता यादीत चमकून कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे.

महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने इयत्ता पहिली पासूनच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी पहिली व दुसरीसाठी 'कोल्हापूर टॅलेंट सर्च', तिसरी व सहावीसाठी 'प्रज्ञाशोध परीक्षा' तर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'स्कॉलरशिप सराव परीक्षा' नियमितपणे घेतल्या जातात. मनपा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी स्कॉलरशिप 2 सराव परीक्षा आणि एक अंतिम स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. परीक्षेचा निकाल पण तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक लावत अवघ्या एक तासात निकाल पालकांच्या मोबाईल वर पाठवण्यात येतो.  या विशेष प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.

            विशेष म्हणजे, अंतिम परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासना इतकीच शिष्यवृत्ती कोल्हापूर महानगरपालिकेकडूनही दिली जाते. अशी  शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. याशिवाय, चौथी  स्कॉलरशिप परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या भाग्यवान विद्यार्थ्यांना थेट विमानाने 'इस्रो' (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जाते, आणि या संपूर्ण दौऱ्याचा खर्च कोल्हापूर महानगरपालिका स्वतः करते.

या ऐतिहासिक यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे याचे श्रेय महापौर सौ.रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, उपायुक्त किरणकुमार धनवाडे व प्रशासनाधिकारी सौ.जयश्री जाधव यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला व नियोनाला दिले जात आहे.

यासाठी प्राथमिक शिक्षण समितीकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, परीक्षा विभाग कडील संजय शिंदे, सर्व अधिकारी व कार्यालयीन स्टाफ यांचे योगदान लाभले आहे.


कोल्हापूर महानगरपालिकेचा शिष्यवृत्ती पॅटर्न भारी
Total Views: 16