बातम्या

कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाबाबत निकष निश्चितीचा अहवाल मागवला; ३१७१ पदांना मंजुरी

Kolhapur police


By nisha patil - 10/7/2026 11:40:41 PM
Share This News:



मुंबई, दि. १० : कोल्हापूर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात नव्याने पोलीस आयुक्तालय निर्मितीसाठी परिपूर्ण निकष निश्चित करण्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना पोलीस महासंचालक कार्यालयाला देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात लेखी निवेदनाद्वारे दिली. तसेच कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, विविध संवर्गातील ३१७१ पदांना मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक व धार्मिक केंद्र असून वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, स्थलांतरित कामगारांची वाढ आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ लक्षात घेता स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज असल्याचे त्यांनी मांडले. सन १९८५ पासून हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले की, कोल्हापूर शहरातील चार, शहरालगतची चार, इचलकरंजीतील तीन तसेच हुपरी व हातकणंगले येथील प्रत्येकी एक अशा एकूण १३ पोलीस ठाण्यांचा समावेश करून पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, राज्यात नव्याने पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासाठी एकसमान निकष निश्चित करण्याची प्रक्रिया पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सुरू आहे.

दि. ११ मार्च २०२६ रोजीच्या शासन पत्रान्वये पोलीस महासंचालक कार्यालयाला परिपूर्ण निकष निश्चित करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यापूर्वी प्रस्तावित १३ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील मागील तीन वर्षांतील गुन्हेगारीचा आढावा घेतला असता भारतीय दंड संहितेतील भाग १ व ५ मधील दखलपात्र गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे, तर भाग ६ मधील गुन्ह्यांमध्ये चढ-उतार दिसून आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध ३० जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये विविध संवर्गातील ३१७१ पदांना मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील नवीन पोलीस आयुक्तालयांसाठी निकष निश्चित झाल्यानंतर त्याआधारे प्राप्त प्रस्तावांवर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अधिवेशनाच्या कामकाजामुळे या विषयावर चर्चा होऊ शकली नसली तरी आगामी हिवाळी अधिवेशनात कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा घडवून आणणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.


कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाबाबत निकष निश्चितीचा अहवाल मागवला; ३१७१ पदांना मंजुरी
Total Views: 41