बातम्या
*कोकण हादरलं आणि आजरा तालुका हलहळला 22 वर्षीय वनरक्षक आश्लेषाने केला जीवनाचा अंत
By nisha patil - 8/17/2026 11:35:35 PM
Share This News:
*कोकण हादरलं आणि आजरा तालुका हलहळला 22 वर्षीय वनरक्षक आश्लेषाने केला जीवनाचा अंत
*आजरा(हसन तकीलदार):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. आंबोली वन परिमंडळात केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 22 वर्षीय महिला कर्मचारीने आपल्या राहत्या घरात जीवन संपवल्याची घटना घडलीय. आश्लेषा सागर मांगले (मूळ रा. लाकूडवाडी ता. आजरा, जि कोल्हापूर) या महिला कर्मचारीचं नाव आहे.
याबाबत हाती आलेली माहिती अशी की,माडखोल धवडकी येथील आपल्या भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेऊन आश्लेषा सागर मांगले यांनी आत्महत्या केल्याची सांगण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या आत्महत्येचे नेमके कारण हाती आलेले नाही. आश्लेषा मांगले या तीन वर्षांपूर्वीच सिंधुदुर्ग वनखात्यात सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांच्यावर आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
आश्लेषा सागर मांगले या माडखोल धवडकी येथे पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने आश्लेषा दिवसभर घरातच होत्या. मात्र, उशिरापर्यंत त्या बाहेर न आल्यामुळे घर मालक गोवेकर यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला. जोर जोरात दरवाजा ठोठवल्यानंतरही घरातून काहीच आवाज न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले. घरातील दृश्य पाहून घर मालकांच्या पायाखालची जमिनीच सरकली. त्यांना आश्लेषा या लटकलेल्या अवस्थेत दिसल्या.
घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी वनविभागाच्या देवसू येथील अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी घरमालक पूजा गोवेकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.
खाकीमधील एक रक्षणकर्ती अचानक आपली जीवनयात्रा संपविल याची कोणालाही पुसटशीही कल्पना नव्हती. वडील सागर मांगले हे एका सहकारी संस्थेत नोकरीला आहेत.अगदी कष्टातून आणि जिद्दीने आपल्या मुलीला शिकवून तिच्या भविष्याची स्वप्नं रंगवली होती. बी. एससी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अवघ्या तीन वर्षांपूर्वीच आश्लेषाची वनरक्षक म्हणून निवड झाली होती. वनपरिमंडळात अगदी जबाबदारीने त्या सेवा बजावीत होत्या. आई वडील अधून मधून त्यांच्याकडे येऊन रहात असत. मागच्या तीन चार दिवसापूर्वीच आई भेटून गेली होती. वडील सागर मांगले यांनी त्यांना शिकवून भविष्याची स्वप्ने रंगवली होती. ज्यावेळी त्या नोकरीस रुजू झाल्या होत्या त्यावेळी सागर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना पाहिले होते. परंतु आज परिस्थिती फार विचित्र होती. ज्या लेकीला काही दिवसापूर्वीच आई भेटून गेली होती त्या आईला आपली लेक कायमची सोडून गेल्याचे समजताच त्या माऊलीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपली लेक कायमची सोडून गेल्याचे वास्तव संपूर्ण कुटुंबासाठी वेदनादायी आणि असह्य होत आहे. एका उमलत्या आयुष्याने ऐन उमेदीत जग सोडलं हे वास्तव मन मानायला तयार नव्हतं.
*कोकण हादरलं आणि आजरा तालुका हलहळला 22 वर्षीय वनरक्षक आश्लेषाने केला जीवनाचा अंत
|