बातम्या
कृषी विभागाची मासिक आढावा सभा तहसील सभागृहात संपन्न*
By nisha patil - 5/19/2026 10:05:47 PM
Share This News:
**कृषी विभागाची मासिक आढावा सभा तहसील सभागृहात संपन्न*
प्रथमच सर्व कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी यांना एकत्र आणण्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे प्रयत्न सफल
आजरा(हसन तकीलदार)*:-कृषी विभागाची आढावा बैठक दि. 19 मे 2026 रोजी तहसील सभागृहात सकारात्मक चर्चेत पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हापरिषद सदस्य सुधीरभाऊ देसाई होते. तर या बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे व जिल्हा कृषीचिकित्सक प्रमोद लोंढे उपस्थित होते.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी केले यामध्ये त्यांनी उपलब्ध कर्मचारी व कामाची माहिती याबरोबरच सन 2025/26 मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा मार्फत शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना, अनुदान वितरण, बियाणे वाटप याबद्दलचा आढावा घेतला व सन 2026/27 मधील प्रस्तावीत नियोजन त्याचबरोबर मागेल त्या नवीन लाभार्थ्याना काजू कलमे देणेबाबत माहिती दिली. विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर जालिंदर पांगरे यांनी महाडिबीटी कृषी विभागाच्या विविध मोहिमा, फळबाग लागवड, विमायोजना बियाणे अनुदान, प्रक्रिया योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान अशा विविध योजनांची परिपूर्ण माहिती दिली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेत काही महत्वाच्या सूचनाही मांडल्या. युवराज पोवार यांनी बिबियाणे, खातांचा पुरवठा यांच्या नियोजनाबाबत, बांबू लागवड प्रस्ताव, शेतकऱ्यांसाठी कोणत्या आधुनिक लागवड पद्धती वापरण्यासाठी मार्गदर्शन केले, काजू पिकाबाबत शासनाच्या वरिष्ठ पातळीवर काय पाठपुरावा केल्या, तसेच शासनाकडून मोफत मिळणारे बिबियाणे पेरणीच्या आधी मिळाव्यात याबाबत सूचना मांडल्या. हरिभाऊ कांबळे म्हणाले की, वरिष्ठानी कामाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास खालचा स्टाफ व्यवस्थित काम करु शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली पाहिजे, शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात सन्मान आणि योग्य वागणूक देणे गरजेचे आहे असे म्हणाले.शेतकरी संघटनेचे संजय देसाई म्हणाले की,वन्याप्राण्यांच्या त्रासाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे त्यामुळे नुकसान भरपाई वाढवून मिळावी म्हणून ठराव करावा अशी सूचना मांडली. समीर चांद यांनी आजऱ्याची ओळख असलेल्या घनसाळचा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले यावर अधिकारी यांनी घनसाळ शासनामार्फत खरेदी विक्री करून यावर उपाययोजना अखण्यात येतील असे सांगितले..दिनेश कांबळे यांनी करपेवाडी बाग, नारायण बाग तसेच सिडफार्म या शेतीखात्याच्या जमिनी भांडवलदारांना देऊ नये याबाबत ठराव करा असे संगितले.
सुधीरभाऊ देसाई म्हटले की, सर्व योजना ऑनलाईन असलेने लोकांनीही जागरूक राहिले पाहिजे. ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच यांची संयुक्त बैठक लावून प्रत्येक आठवड्याचा वार ठरवून कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहचवावी असे सांगितले. कॉ. काशिनाथ मोरे म्हणाले की, प्रत्येक ग्रामसभेला कृषीसहाय्यक जाणे गरजेचे आहे. उपसभापती यशोदा पोवार यांच्यामुळे आज सर्व अधिकाऱ्यांना पाहण्याची संधी मिळाली असेही नमूद केले.तंत्र अधिकारी कोल्हापूर बुकेश्वर गोडगे यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, दीपक मुळे (कृषी अधिकारी) मोने (मंडळ कृषी अधिकारी ),फुले (मंडळ कृषी अधिकारी, उत्तूर ), यमगेकर (कृषी विभाग आजरा ), सर्व उपकृषी अधिकारी, सहाय्य्क कृषी अधिकारी, पीएम किसान डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी आभार मानले.
**उपसभापती सौ. यशोदा पोवार यांच्या प्रयत्नातून कृषी विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल सुधीरभाऊ देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले.*
कृषी विभागाची मासिक आढावा सभा तहसील सभागृहात संपन्न*
|