बातम्या

चारी बाजूनी शेतकरी चित,गवा रेड्यांकडून काजू फळझाडांचे नुकसान

Krushi news


By nisha patil - 5/25/2026 9:53:29 PM
Share This News:



**चारी बाजूनी शेतकरी चित,गवा रेड्यांकडून काजू फळझाडांचे नुकसान*

**आजरा(हसन तकीलदार)*:-निसर्गाने तारले तर सरकार मारतंय, यातूनही वाचलं तर वन्यप्राणी नुकसान करतंय अशी अवस्था आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शक्तीपीठाच्या गोंडस नावाखाली शेतजमिनी बळकवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

शक्तिपीठ ज्याचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा नाही त्या महामार्गाला एक लाख करोड रुपये खर्च करायला सरकार तयार आहे परंतु ज्या जंगली प्राण्यापासून शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान होत आहे त्यावर उपाय योजना आखण्यासाठी, वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही . हा इतका विरोधाभास का? असा सवाल शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.वन्यप्राण्याकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.वेळवट्टी ता. आजरा येथील 

डॉक्टर धनाजी गोविंद राणे यांच्या वेळवटी येथील उंबराचे पाणी 

या शेतामधील गवा रेड्यांच्या कळपाने काजू फळपिकांची झाडें मोडली आहेत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

                    वास्तविक पाहता एकीकडे 

यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त दहा ते पंधरा टक्के काजू बिया उत्पादन मिळत असताना दुसरीकडे मात्र काजू फळपीक झाडांचे गवारेड्यांकडून नुकसान करणे सत्र सुरूच आहे. यावर्षी काजू, आंबा पिकांना म्हणावा तसा बहर आला नसल्याने काजू आणि आंबा पीक उत्पन्नात घट झाली आहे.

त्यामुळे यावर्षी काजू बियांचे उत्पादन कमी झाले आहे.तरीसुद्धा काजू बी प्रतिकिलो दर मात्र 140 ते 150 रुपये दरम्यान आहे असे चित्र आहे.आणि त्यातच गवा रेड्यानी काजू झाडांचे नुकसान केल्याने राणे यांचे नुकसान झाले आहे.

एकीकडे आजरा हा डोंगराळ आणि मागास तालुका असून तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जलसिंचन योजनांच्या सुविधा अपुऱ्या व अतिपावसाचे ठिकाण असल्याने फक्त काजू व मेसकाटीसारख्या उत्पादनावर येथील शेतकऱ्यांचे आर्थार्जनाचे साधन आहे.यावर्षी गवा रेड्यांकडून काजू फळ पिकांचे वारंवार होणारे नुकसान आणि दहा-वीस टक्केच मिळालेल्या काजू बी उत्पादन आणि त्यातच सध्याचा मिळणारा प्रति किलोचा कमी दर या तिहेरी संकटामध्ये येथील शेतकरी सापडला आहे.मागील 2006 पासून हत्ती ,गवारेडा,रानडुक्कर, माकडे आणि इतर वन्य प्राण्यापासून होणारे शेत पिकाचे व फळपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

यासाठी सन 2006 पासून आत्तापर्यंत वन्यप्राण्याकडून जंगलाशेजारील शेतकऱ्यांचे फळ व शेत पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शंभर टक्के अनुदानावर सौरकुंफण योजना मिळावी यासाठी निवेदने दिली असली तरी ‌आजपर्यंत सदर योजना शासनाने मंजूर केलेली नाहीत.

  सरकारने वन्यप्राण्यावर तातडीने उपाययोजना आखून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी असे मत डॉ. धनाजी राणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


चारी बाजूनी शेतकरी चित,गवा रेड्यांकडून काजू फळझाडांचे नुकसान
Total Views: 88