बातम्या

मल्हारपेठ-सांगरुळ मार्गावरती रस्त्याला भगदाड ; अवजड वाहतूकीस धोका, सा.बां.विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

Large pothole cavity on the MalharpethSangrul road


By nisha patil - 7/20/2026 11:46:38 AM
Share This News:



मल्हारपेठ-सांगरुळ मार्गावरती रस्त्याला भगदाड ; अवजड वाहतूकीस धोका, सा.बां.विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

मल्हारपेठ-सांगरुळ मार्गावरील मोरेवाडी ( ता.पन्हाळा ) येथील कळंबा ओढ्यावरील (मोरी) पुलावरती मधोमध मोठे भगदाड पडलेले असून रस्ता खचण्याची शक्यता आहे. शनिवार दि.१८ रोजी. सकाळी भगदाड पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या मार्गावरून नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. कोणताही मोठा अपघात घडू नये यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने पावले उचलत रस्त्यावरील झाडांच्या फांद्या आणि लाकडाचे मोठे ओंडके लावून हा मार्ग एकेरी केला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांतून होत आहे.
 

मोरीवरील मोठे भगदाड सुमारे दोन फुटाचे असून आतील बाजूचा भराव पूर्णपणे मोकळा झाला असून रस्त्यास धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक पुलावरून अवजड वाहतूक झाल्यास मोरी पूर्णपणे कोसळण्याची शक्यता आहे.
 

मल्हारपेठ-सांगरुळ (ता.पन्हाळा-करवीर) ला जोडणारा अत्यंत जवळचा व सोयीचा मार्ग असल्याने धामणी खोऱ्यातील प्रवासी व वाहनांची या रस्त्याने मोठी वाहतूक होते.
 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सन२०१९ मध्ये मल्हारपेठ -सांगरूळ दरम्यान सुमारे ४.७५० कि.मी. रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर पाच वर्षे देखभाल करण्यात आली होती. ठेकेदाराचा कराराचा कालावधी संपल्यानंतर रस्त्याला कोणी वालीच उरला नाही. पूर्ण रस्त्याची चाळण झाली असून रस्त्यात खड्डे कि खड्यांत रस्ता आहे, अशी दुरावस्था झाली आहे. बाजूपट्टया देखील खचल्या आहेत. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरती अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. रस्त्याच्या देखभालीकडे सा.बां.विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत परिसरातील नागराकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
 

 [ मल्हारपेठ-सांगरूळ मार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. बाजू पट्ट्या खचलेल्या आहेत. ते प्रवासी व वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहेत. सा.बां.विभागाने याची दखल घेऊन त्वरित पुल व रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. = डॉ.रणजित तांदळे, सरपंच,मोरेवाडी. ]


मल्हारपेठ-सांगरुळ मार्गावरती रस्त्याला भगदाड ; अवजड वाहतूकीस धोका, सा.बां.विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.
Total Views: 11