बातम्या
*ग्रामीण भागातील गरीब व आदिवासी कुटुंबानासुद्धा उत्सव साजरा करु द्या
By nisha patil - 11/9/2026 3:19:31 PM
Share This News:
*ग्रामीण भागातील गरीब व आदिवासी कुटुंबानासुद्धा उत्सव साजरा करु द्या
*त्यांच्याकडूनही खरेदी करा आणि त्यांच्या अर्थार्जनाला हातभार लावा
*आजरा(हसन तकीलदार):-गणेशोत्सव काळात खेडेगावतील गरीब आदिवासी कुटुंबे जंगलातून रानफुले आणि रानभाज्या गोळा करून आजरा शहरात विक्रीसाठी येत असतात. ही विक्री त्यांच्यासाठी केवळ एक हंगामी व्यवसाय नसून वर्षभराच्या आर्थिक विवंचनेतून काही काळासाठी मिळणारा मोठा दिलासा असतो. त्यामुळे तोलमोल न करता या गरिबांच्याकडूनही खरेदी केली पाहिजे आणि त्यांच्या उत्सवालाही हातभार लावला पाहिजे.
गणेशपूजनात 21 पत्रि आणि गौरी गणपतीच्या मारविसाठी पारंपारिक रानफुलांना अनन्यसाधारण महत्व आहे. शेरवड, कांगणी,हरणवेल,कवंडळे, गौरीची फुले त्याचप्रमाणे दुर्वा, शमी, बेल, तुळशी, मखमाली, अर्जुन, केवडा, आघाडा, कण्हेर यासारख्या वनस्पती आणि गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या अळू, टाकला, कुर्डू, घोळ आणि शेवळा यासारख्या पूर्णपणे नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या भाज्या हे गरीब आदिवासी रानावनात भटकून गोळा करून आणतात आणि विकतात. यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असते. ते प्रामुख्याने भूमिहीन शेतमजूर किंवा अल्पभूधारक असतात. दिसताना हा व्यवसाय सोपा वाटत असला तरी त्यामागे या कुटुंबाचे अतोनात कष्ट दडलेले असते. पहाटे 4 वाजल्यापासून ही कुटुंबे घनदाट जंगलात, डोंगराळ भागात आणि चिखलातून रानफुले शोधण्यासाठी मैलोन्मैल पायी भटकतात. यात साप किंवा हिंस्त्र श्वापदांचा धोका सतत असतो. ही गोळा केलेली फुले, भाज्या शहरापर्यंत आणताना एस. टी. किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. ज्यासाठी प्रवास खर्चही करावा लागतो.
बाजारात चिनी प्लास्टिकची फुले, कृत्रिम सजावटीचे साहित्य असल्यामुळे पारंपारिक रानफुलांच्या मागणीवर काही परिणाम होत आहे. तरीही चोखंदळ आणि धार्मिक ग्राहक अजूनही नैसर्गिक रानफुलांनाच पसंती देतात. बाप्पाच्या आगमनामुळे शहरात होणाऱ्या कोट्यावधिंच्या उलाढालीत हा छोटासा वाटा या ग्रामीण कुटुंबातील घरात समृद्धीचा दिवा पेटवू शकतो. तेही उत्सव साजरा करु शकतील. मुलांच्या शिक्षणाचा भार उचलू शकतील, आपल्या कुटुंबाचा गाडा हाकू शकतील म्हणून या गरिबाकडूनही खरेदी करा आणि त्यांच्या कुटुंबाला, मुलांच्या शिक्षणाला हातभार लावा.
*ग्रामीण भागातील गरीब व आदिवासी कुटुंबानासुद्धा उत्सव साजरा करु द्या
|