बातम्या

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेचा गारगोटी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; निवेदनाद्वारे प्रशासनाला युवराज येडूरे यांचा इशारा

MNS stages a protest march to the Gargoti Mahavitran office


By nisha patil - 6/8/2026 2:13:33 PM
Share This News:



स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेचा गारगोटी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; निवेदनाद्वारे प्रशासनाला युवराज येडूरे यांचा इशारा

गारगोटी (प्रतिनिधी): स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात तसेच वीज ग्राहकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भुदरगड तालुकाच्या वतीने आज गारगोटी येथे महावितरण कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारक (क्रांती चौक) येथून सुरू झालेल्या मोर्चात शेतकरी, व्यापारी, युवक, महिला आणि वीज ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी “स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा”, “वीज ग्राहकांना न्याय द्या”, “अन्यायकारक वीज बिले रद्द करा” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

महावितरण कार्यालयासमोर झालेल्या सभेत मनसेचे नेते डॉ. युवराज  येडूरे यांनी स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम व नाराजी असल्याचे सांगितले. जनतेशी संवाद न साधता कोणतीही योजना सक्तीने राबवू नये, वाढीव व चुकीच्या वीज बिलांची तातडीने चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे, वीज बिलांमध्ये पारदर्शकता राखणे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

राहुल पाटील (तालुकाध्यक्ष), के के भारतीय 
, राहुल कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विश्वजीत पाटील (तालुका उपाध्यक्ष) प्रकाश पाटील, के. के भारतीय, आकाश पाटील, सुशांत पाटील, संदीप पाटील, प्रवीण देसाई, संदीप राजीगरे,संदीप देसाई, विकास गोठणकर, मोहन ढेकळे, अर्जुन पाटील,जयवंत कळमकर, विजय गुजर, संतोष देसाई, सचिन नलवडे, यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुदरगड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी, मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसेचा गारगोटी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; निवेदनाद्वारे प्रशासनाला युवराज येडूरे यांचा इशारा
Total Views: 13