बातम्या

*बारकोडयुक्त विवाहनोंदी दाखले तात्काळ उपलब्ध करून देण्याची सुविधा करा-नगरसेवक आसिफभाई सोनेखान यांची मागणी

Make arrangements to provide barcode


By nisha patil - 7/24/2026 5:21:09 PM
Share This News:



*बारकोडयुक्त विवाहनोंदी दाखले तात्काळ उपलब्ध करून देण्याची सुविधा करा-नगरसेवक आसिफभाई सोनेखान यांची मागणी
 

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या हद्दीत आजरा ग्रामीण रुग्णालयातर्फे विवाह नोंदणी करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु विवाह नोंदणी दाखल्यावर बारकोड नसल्यामुळे शासकीय तसेच निमशासकीय कामामध्ये अडचणीचा सामना करावा लागत आहे. खेडेगावातील ग्रामपंचायतिमध्ये बारकोडचे दाखले उपलब्ध असल्याचे समजते परंतु आजऱ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी बारकोड विवाह नोंद दाखले मिळत नाहीत. या अगोदरही ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना तोंडी सांगण्यात आले होते परंतु यावर अजूनही कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नसल्याने बारकोडयुक्त विवाहनोंदणी दाखले मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबत आजरा तहसीलदार समीर माने यांना नगरसेवक असिफभाई सोनेखान यांनी निवेदन दिले आहे.
     

निवेदनात म्हटले आहे की,आजरा नगरपंचायतीच्या हद्दीत आजरा ग्रामीण रुग्णालयातर्फे विवाह नोंदणी करून दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी, सध्या आजरा ग्रामीण रुग्णालयाकडून बारकोडयुक्त विवाह नोंदणी दाखले दिले जात नाहीत, अशी अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
सध्या मतदान ओळख पत्र, शासकीय योजना, पासपोर्ट, आधार लिंकिंग, तसेच इतर शासकीय, निमशासकीय कामांसाठी बारकोड असलेला विवाह नोंदणी दाखला अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती कायद्याच्या व नियमांच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे; प्रत्येक विवाहीतेला अद्यावत, अचूक व प्रमाणित विवाह नोंदणी दाखला मिळणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे.

 

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत पारदर्शक व पडताळणीयोग्य कागदपत्रे देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सर्व दाखले ऑनलाईन पडताळणीयोग्य (verifiable) असणे आवश्यक आहे, ज्यासाठी बारकोड/क्यू आर कोड आवश्यक ठरतो.परंतु, आजरा ग्रामिण रुग्णालय मार्फत सध्या बारकोड नसलेले विवाह नोंदणी दाखले दिल्यामुळे उपरोक्त नमूद केलेल्या शासकीय तसेच निमशासकीय कामात अडथळे निर्माण होत आहेत.शासकीय कागदपत्रे अपूर्ण राहतात त्यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

त्यामुळे प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे म्हणून, आजरा ग्रामीण रुग्णालयाकडून तात्काळ बारकोडयुक्त विवाह नोंदीचे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करण्या संदर्भात आजरा ग्रामिण रुग्णालयातील संबंधीत विभागाला निर्देश देणे गरजेचे आहे. तसेच, जुने (बारकोड नसलेले) दाखले बारकोडसह पुनःप्रमाणित करून देण्यात यावेत. नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड व पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना व आदेश पारित करण्यात यावेत 
आपण या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांच्या अडचणी दूर करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 

 यावेळी असिफभाई सोनेखान (नगरसेवक ), अमजद माणगावकर (विशेष कार्यकारी अधिकारी), आसिफ पटेल (नगरसेवक), इब्राहिम इंचनाळकर उपस्थित होते.
 या निवेदनाच्या प्रती ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी व प्रांताधिकारी आजरा -भुदरगड विभाग, गारगोटी यांनाही देण्यात आल्या आहेत.


*बारकोडयुक्त विवाहनोंदी दाखले तात्काळ उपलब्ध करून देण्याची सुविधा करा-नगरसेवक आसिफभाई सोनेखान यांची मागणी
Total Views: 365