बातम्या
खडकेवाडा येथे म्हशीच्या गोठ्याला भीषण आग; गाभण म्हैस व गाईच्या वासराचा होरपळून मृत्यू, सुमारे ६ लाखांचे नुकसान
By nisha patil - 7/21/2026 7:46:18 PM
Share This News:
खडकेवाडा येथे म्हशीच्या गोठ्याला भीषण आग; गाभण म्हैस व गाईच्या वासराचा होरपळून मृत्यू, सुमारे ६ लाखांचे नुकसान
कागल प्रतिनिधी अजित बोडके कागल तालुक्यातील खडकेवाडा येथे सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास म्हशीच्या गोठ्याला भीषण आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. या आगीत एका गाभण म्हशीचा व गाईच्या वासराचा होरपळून मृत्यू झाला, तर आणखी एक गाभण म्हैस गंभीर जखमी झाली आहे.
ही घटना शब्बीर महमंद मुल्ला यांच्या गोठ्यात घडली. आग इतकी भीषण होती की गोठ्याचे शेड पूर्णपणे जळून खाक झाले. आगीमुळे जनावरांसह गोठ्यातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गोठा मोठ्या प्रमाणात जळून गेला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शेतकरी शब्बीर महमंद मुल्ला यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
खडकेवाडा येथे म्हशीच्या गोठ्याला भीषण आग; गाभण म्हैस व गाईच्या वासराचा होरपळून मृत्यू, सुमारे ६ लाखांचे नुकसान
|